घरच्या घरी अशी तयार करा मिल्क पावडर


अनेकदा प्रवासाला बाहेर जात असताना चहा किंवा कॉफीसाठी बाजारातली तयार दुधाची पावडर आपण सोबत नेत असतो. केवळ प्रवासामध्येच नाही, तर घरातही अनेक पदार्थांमध्ये घालण्यासाठी मिल्क पावडर वापरली जात असते. अशा वेळी बाजारातली तयार मिल्क पावडर आणण्याच्या ऐवजी ही पावडर आपल्याला घरच्याघरी देखील तयार करता येऊ शकते. ही पावडर घरच्याघरी तयार करण्याची कृती अतिशय सोपी असून, अशा प्रकारे तयार केलेली मिल्क पावडर घट्ट झाकणाच्या बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवल्यास पुष्कळ दिवस टिकून राहते.

ही मिल्क पावडर तयार करण्यासाठी एका मोठ्या नॉनस्टिक कढईमध्ये दोन लिटर दुध उकळण्यास ठेवावे. या दुधाचा घट्ट खवा होईपर्यंत हे दुध आटू द्यावे. कढईमधील दुध वारंवार हलवत राहवे अन्यथा दुध कढईच्या तळाशी लागण्याची शक्यता असते. दुध संपूर्ण आटून त्याचा खवा तयार झाला, की हा खवा एका ताटामध्ये काढून घ्यावा. हा खवा ताटामध्ये पसरून ठेवावा, त्यामुळे हा खवा लवकर थंड होण्यास मदत होते. खवा थंड झाल्यानंतर तो हाताने पातळ थापून घेत ताटामध्ये व्यवस्थित पसरून, व त्यावर अगदी पातळ कपडा घालून पंख्याखाली ठेवावा. हा खवा साधारण तीन ते चार तास पंख्याखाली राहू द्यावा.

खव्यातील ओलसरपणा पूर्णपणे वाळला असल्याची खात्री करून घेऊन घ्यावी. खवा थोडाजरी ओलसर असा तरी आणखी काही वेळ पंख्याखाली वाळू द्यावा. खवा संपूर्ण वाळल्यानंतर थोडासा हाताने चुरून पाहावा. खवा संपूर्ण वाळला असल्यास हाताला न चिकटता त्याची लगेच भुकटी होते. खव्याची अशी भुकटी होत असल्यास, खवा हाताने चुरून घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये घालावा, आणि ‘पल्स’ मोड वर मिक्सरवर बारीक दळावा. हा मिक्सरवर बारीक केलेला खवा बारीक चाळणीतून चाळून घ्यावा. आवडत असल्यास थोडीशी पिठीसाखरही चाळून घेऊन या मिल्क पावडरमध्ये मिसळावी. त्यामुळे मिल्क पावडरला थोडीशी गोडसर चव येते. तयार झालेली मिल्क पावडर घट्ट झाकणाच्या बरणीमध्ये भरून आर्द्रता नसलेल्या ठिकाणी किंवा फ्रीजमध्ये ठेवावी आणि आवश्यकतेप्रमाणे उपयोगात आणावी.

Leave a Comment