प्रिन्स फिलीप यांचा ९८वा जन्मदिन उत्साहात साजरा


ब्रिटनच्या राणी एलीझाबेथ यांचे पती प्रिन्स फिलीप यांचा ९८वा जन्मदिवस सोमवारी मोठ्या थाटाने साजरा करण्यात आला असून, या निमित्ताने सर्व शाही परिवाराने त्यांना प्रत्यक्षात भेटून आणि सोशल मिडीयाच्या द्वारेही शुभेच्छा दिल्या. शाही परिवारातील सदस्यांनी त्यांच्या औपचारिक इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या असून, असंख्य ब्रिटीश नागरिकांनी या पोस्ट्सवर प्रतिक्रिया व्यक्त करीत प्रिन्स फिलीप यांच्या जन्मदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रिन्स फिलीप यांचा जन्म १० जून १९२१ रोजी झाला असून, यंदा त्यांनी वयाची ९८ वर्षे पूर्ण केली आहेत. दोन वर्षांपूर्वी प्रिन्स फिलीप यांनी सर्व औपचारिक आणि सामाजिक जबाबदाऱ्यांमधून निवृत्ती घेत आपला मुक्काम, सँड्रींगहॅम इस्टेट या राणीच्या खासगी मालमत्ता असलेल्या निवासस्थानी हलविला आहे. गेली दोन वर्षे सामाजिक कार्यक्रमांमध्येही प्रिन्स विलियम फारसे सहभागी होत नसल्यामुळे ब्रिटीश जनतेला आणि शाही परिवाराला देखील त्यांचे सातत्याने होणारे दर्शन आता काहीसे दुर्मिळ झाले आहे. काही खास कौटुंबिक समारंभाच्या निमित्तानेच केवळ प्रिन्स फिलीप परिवारासोबत सहभागी होत असून, आपला बाकी वेळ नॉरफोक येथेच व्यतीत करत असतात. त्यामुळे राणी एलिझाबेथ बहुतेकवेळी एकट्याच सर्व औपचारिक कार्क्रमांमध्ये सहभागी होत असतात. त्यांच्या सोबतीला शाही परिवारातील सदस्य दिसत असले, तरी प्रिन्स फिलीप यांची अनुपस्थिती मात्र सर्वांनाच जाणवत असते.

प्रिन्स फिलीप यांचा जन्म ग्रीसमध्ये झाला असून, प्रिन्स अॅलिस ऑफ बॅटेनबर्ग आणि प्रिन्स अँड्र्यू ऑफ ग्रीस अँड डेन्मार्क हे प्रिन्स फिलीप यांचे माता-पिता होते. प्रिन्स फिलीप यांना चार बहिणी असून, प्रिन्सेसेस सिसिली, सोफी, मार्गारिटा, आणि थियोडोरा अशी त्यांची नावे होती. प्रिन्स फिलीप आणि राणी एलिझाबेथ यांचा विवाह १९४७ साली झाला असून, त्यांना प्रिन्स चार्ल्स, प्रिन्स अँड्र्यू, आणि प्रिन्स एडवर्ड अशी तीन मुले व, प्रिन्सेस अॅन ही या दाम्पत्याची कन्या आहे.

Leave a Comment