या वर्षाअखेरीस सुरुवात होणार हायपरलूपच्या कामाला


मुंबई : मुंबई-पुणे प्रवास कमीत-कमी वेळेत पूर्ण करण्यासाठी एक महत्त्वकांक्षी प्रकल्प महाराष्ट्र सरकारने हाती घेतला आहे. यावर्षीच्या अखेरपर्यंत या प्रकल्पाचे काम सुरु होणार असल्याची माहिती समोर आली आहे. याविषयीची माहिती हे काम करणाऱ्या व्हर्जिन हायपरलूप वन या अमेरिकन कंपनीचे भारताचे व्यवस्थापकीय संचालक हर्ज धालिवाल कन्स्ट्रक्शन वीकला दिली.

मुंबई-पुणे हायपरलूप मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर साडेतीन तासांचा मुंबई-पुणे प्रवास फक्त 25 मिनिटात पूर्ण करता येईल. पुणे आणि मुंबईमधील अंतर 150 किलोमीटर आहे. जवळपास 2 कोटी 60 लाख नागरिकांना या प्रस्तावित प्रकल्पाचा फायदा होईल, असाही अंदाज वर्तवला जात आहे.

पुणे आणि नवी मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळही मुंबई-पुणे हायपरलूप मार्गामुळे जोडले जाणार आहे. या मार्गाच्या पहिल्या टप्प्यात केवळ 11.8 किलोमीटरचा ‘डेमॉन्स्ट्रेशन ट्रॅक’ असणार आहे. त्याचे काम 2023 पर्यंत पूर्ण होईल, असे सांगण्यात येत आहे. याच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी व्हर्जिन हायपरलूप वन कंपनी 500 मिलियन डॉलरची खासगी गुंतवणूक करणार आहे.

पहिल्या टप्प्यातील कामात जमीन अधिग्रहणासाठी कोणतेही अडथळे नसल्याने या प्रकल्पाचे काम पूर्ण होण्यास कोणताही विलंब होणार नाही. पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील काम सुरु करण्यात येईल. यात मुंबई ते बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स आणि नवी मुंबई अशा मार्गांच्या कामाचा समावेश असेल.

मुंबई-पुणे महामार्गावरुनच मुंबई-पुणे हायपरलूप मार्ग समांतर जाईल. सध्याची आधुनिक प्रकारातील हायपरलुप वाहतूक मानली जाते. याद्वारे कमीत कमी वेळात प्रवाशांना एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी पोहचता येते. ही वाहतूक विशेष अशा हायपरलुप वाहनातून कमी दाबाच्या ट्युबमध्ये वीजेच्या वेगाप्रमाणे होते. हे वाहन चुंबकीय क्षेत्राचा उपयोग करुन ट्रॅकच्या वर तरंगत प्रवास करते.

मुंबई-पुणे असा प्रवास प्रत्येकवर्षी 20 कोटींपर्यंत प्रवाशी करतील, असा अंदाज आहे. इतरही काही प्रकल्प ही गरज लक्षात घेऊन सुरु करण्याचा विचार होणार असल्याचे सांगितले जात आहे. पण या नव्या वाहतूक मार्गाची सार्वजनिक वापरासाठीची व्यवहार्यता आणि सुरक्षितता राज्य सरकारला पटवून देण्यासाठी हा पहिला प्रकल्प ही कंपनी करत आहे.

Leave a Comment