धवनच्या दुखापतीनंतर ‘हा’ खेळाडू निघाला इंग्लंडला?


मुंबई – काल टीम इंडियाच्या विश्वचषक मोहिमेला सर्वात मोठा धक्का बसला असून भारताचा सलामीवीर शिखर धवनला अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे तीन आठवडे क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या धवनला ही दुखापत सामन्यात पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर झाली होती. त्याच्या या दुखापतीचा वैद्यकिय अहवाल मंगळवारी आला आणि त्याच्या अंगठ्याला फॅक्चर झाल्याचे समोर आल्यामुळे बांगलादेश (2 जुलै) किंवा श्रीलंका (6 जुलै) यांच्याविरुद्ध सामन्यापर्यंत धवन खेळण्यासाठी तंदुरुस्त होईल, याची शक्यता कमीच आहे.

भारतामध्ये दुखापतग्रस्त धवनला पाठवण्यात येणार नाही. संघाबरोबर धवन हा इंग्लंडमध्येच राहणार आहे. त्याचबरोबर धवनचा पर्यायी खेळाडू तुर्तास तरी निवडण्यात येणार नाही. याबाबतची माहिती बीसीसीआयने एक ट्विट करत दिली आहे. पण यासंदर्भात टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार धवनची दुखापत गंभीर असून विश्वचषक स्पर्धेतून तो माघार घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिल्लीचा यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंतला अशा परिस्थितीत इंग्लंडसाठी रवाना होण्यास सांगण्यात येणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

धवनच्या दुखापतीचा अंतिम अहवाल हाती आल्यानंतर संघ व्यवस्थापन त्याच्या बदलीची विनंती आयोजकांकडे करणार आहे. धवनला बदली खेळाडू म्हणून पंतला बोलावण्यात येणार आहे. धवनची दुखापत ही गंभीर असल्याची माहिती टाईम्स ऑफ इंडियाला सूत्रांनी दिली आहे.

निवड समितीने विश्वचषक स्पर्धेसाठी अंतिम 15 जणांचा संघ जाहीर करताना रिषभ पंतकडे दुर्लक्ष केले. समितीने त्याचे नाव चर्चेत असताना अनुभवी दिनेश कार्तिकला राखीव यष्टिरक्षक म्हणून संघात स्थान दिले. पण, आता धवनच्या दुखापतीमुळे पंतचे विश्वचषक स्पर्धेमध्ये खेळण्याचे दार उघडे झाले आहे. त्यामुळे पुढील 48 तासात तो लंडनसाठी रवाना होऊ शकतो.

Leave a Comment