मलालमधील नवे गाणे तुमच्या भेटीला


शर्मिन सेहगल आणि मिजान जाफरी हे स्टारकिड्स दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्या आगामी ‘मलाल’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आला होता. त्यानंतर, दोन गाणीदेखील प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. आता या चित्रपटातील नवे गाणे रिलीज करण्यात आले आहे. गणेशोत्सवातील धमाल असलेल्या या गाण्याचे बोल ‘उधळ हो’ असे आहेत.

ढोल ताषांच्या गजरातील गाण्यांचे बोल गणेशोत्सवात आपल्या कानावर पडतात. असेच ‘मलाल’चे हे नवे गाणे आहे. हे गाणे मराठमोळा गायक आदर्श शिंदे आणि श्रेयस पुराणिक यांनी गायले आहे. तर, या गाण्याचे बोल प्रशांत इंगोलेने लिहिले आहेत. विशेष म्हणजे संजय लिला भन्साळी यांनीच हे गाणे संगीतबद्ध केले आहे.

चाहत्यांची चांगली पसंती ‘मलाल’ चित्रपटाच्या ट्रेलरला मिळत आहे. या चित्रपटात मराठी आणि गैरमराठी तरुण-तरुणीची प्रेमकथा दाखवण्यात येणार आहे. शर्मिन सेहगल हिचा मराठमोळा लूक या गाण्यात पाहायला मिळतो. तर, मिजान जाफरीच्या नृत्याचीही झलक यामध्ये पाहायला मिळते. ५ जुलै रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Leave a Comment