कमी उंचीच्या लोकांसाठी ‘वन फूट टॉलर’ नावाचा अनोखा चष्मा


कमी उंचीच्या लोकांना अनेकदा त्यांच्या उंचीवरुन डिवचले जाते. त्यांना आपल्या लहान उंचीमुळे अनेक ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागतो. लहान उंचीमुळे अनेक कार्यक्रमांमध्ये किंवा गर्दीच्या ठिकाणी समोर काय सुरु आहे याचा अंदाज लहान उंचीच्या लोकांना येत नाही. पण एका संशोधकाने त्यांच्या या अडचणीवर ‘पेरिस्कोप ग्लासेस’चा भन्नाट पर्याय शोधून काढला आहे.

‘वन फूट टॉलर’ नावाचा अनोखा चष्मा डॉमनिक विलकॉक्स या व्यक्तीने तयार केला आहे. लहान उंचीच्या व्यक्तींना या चष्माच्या मदतीने त्यांच्या उंचीपेक्षा एक फूट अधिक वरुन समोरच्या गोष्टी पाहता येणार आहे. या चष्म्याच्या मध्यभागी ३०.५ सेंटीमीटर लांबीची एक दांडी असून त्यावर दोन रिफेक्टर बसवण्यात आले आहेत. काचांऐवजी रिफेक्टर या चष्म्यामध्ये वारण्यात आले आहेत. वरील रिफेक्टरमधील इमेज डोळ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी चष्म्याच्या फ्रेममध्येही रिफलेक्टर बसवण्यात आले आहे. गर्दीच्या ठिकाणी किंवा गरज असेल तेथे लहान उंचीच्या व्यक्तींना हा चष्मा घालून एक फूट उंचावरून समोर दृष्य पाहता येईल.

हा चष्मा बनवण्याची कल्पना मला आलेल्या एका अनुभवानंतर सुचल्याचे विलकॉक्स सांगतो. एका म्युझिक कॉनसर्टला मी गेलो होतो. गाण्याचा आस्वाद घेत असताना त्यावेळी मी मागे वळून पाहिले तेव्हा माझ्या मागे उभ्या असलेल्या लहान उंचीच्या महिलेला माझ्या उंचीमुळे अडचण होत असल्याचे मला जाणवले. तिला मी समोर उभा राहिल्यामुळे स्टेजवर काय सुरु आहे हे दिसत नव्हते. लहान उंचीच्या व्यक्तींना समोरचा अडथळा दूर करुन अधिक उंचीवरुन पाहता यावे असा चष्मा तयार करण्याची कल्पना यामुळे मला सुचली, असे विलकॉक्सने आपल्या साईटवरील पोस्टमध्ये लिहीले आहे.

या ‘वन फूट टॉलर’ चष्म्यात वापरण्यात आलेले रिफ्लेक्टर हे काचेचे आवरण असणाऱ्या अॅक्रेलिकपासून बनण्यात आले असून ते ४५ अंशात बसवण्यात आले आहे. लंडनमध्ये मायक्रोसॉफ्ट या कंपनीने नवीन संशोधकांसाठी आयोजित केलेल्या स्पर्धेसाठी विलकॉक्स हा चष्मा तयार केला. या स्पर्धेची एक्ट्राऑर्डीनरी सोल्यूशन्स’ फॉर ‘एव्हरीडे प्रॉब्लेम’ म्हणजेच दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठीचे भन्नाट उपाय अशी थीम होती.

Leave a Comment