खऱ्या मांसाला टक्कर आता कृत्रिम मांसाची!


तुम्ही कधी कृत्रिम मांसाबद्दल किंवा पर्यायी मांसाबद्दल ऐकले आहे का? बहुतांश लोकांना याबद्दल माहिती नाही, मात्र ज्या झपाट्याने याची मागणी वाढत आहे त्यावरून लवकरच प्रत्येकाच्या तोंडी कृत्रिम मांसाचे नाव असेल, यात शंका नाही. विशेषतः अमेरिकेत याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याच मुळे तेथील सुपर मार्केटमध्ये मोठी मागणी असलेल्या मांसाच्या रांगेत हे कृत्रिम मांस ठेवण्यात येत आहे.

गंमत म्हणजे नाव पर्यायी मांस (‘अल्टरनेटिव्ह मीट’) असे याचे नाव असले तरी हे मांस असते पूर्णपणे शाकाहारी! काही विशिष्ट वनस्पतींपासून हे मांस बनते. मोठमोठ्या खाद्यपदार्थांच्या ब्रॅंडनी या मांसात स्वारस्य दाखवले आहे. त्यामुळे शाकाहार प्रेमींमधून याची जास्त चर्चा होत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ग्राहकांमध्ये आता पर्यावरण आणि आरोग्याबाबत जागरूकता वाढत आहे. त्यामुळे वनस्पतींवर आधारित ‘मांसा’कडे त्यांचा ओढा वाढत आहे.

म्हणूनच जगातील आघाडीच्या अनेक कंपन्यांनी या क्षेत्रात आघाडी घेतली आहे. बर्गर किंग या हॉटेल साखळीने एप्रिल महिन्यापासून ‘हूपर’ या शाकाहारी पदार्थांच्या चाचण्या घेण्यास सुरूवात केली आहे. मॅकडोनाल्ड या प्रसिद्ध ब्रँडनेही जर्मनीत मांसाशिवायचे बर्गर देण्यास सुरूवात केली आहे. केंटुकी फ्राईड चिकन या कंपनीने निरामिष पदार्थ देणे सुरू केले आहे. टायसन फूड आणि करगिल यांसारख्या मोठमोठ्या मांस-विक्रेत्या कंपन्यांनी या क्षेत्रात लाखो डॉलरची गुंतवणूक केली आहे, तर नेस्ले या जगप्रसिद्ध कंपनीने एप्रिलमध्ये इन्क्रेडिबल बर्गर नावाचा पदार्थ विकणे सुरू केले आहे. यात सोया, गहू आणि बीटरूट व अन्य पिकांपासून बनविलेल्या मांसाचा वापर केला जातो. यूनिलिव्हर या कंपनीने याच व्यवसायासाठी गेल्या वर्षी व्हेजिटेरियन बूचर या ब्रँडचे अधिग्रहण केले. इम्पॉसिबल बर्गर या कंपनीने अमेरिका आणि आशियात 7,000 बर्गर रेस्तरां उघडले आहेत. त्यासाठी कंपनीने 30 कोटी डॉलरचे भांडवल उभे केले आहे.

विशेष म्हणजे गुंतवणूकदारांमध्येही पर्यायी मांस उद्योगाला चांगलीच मागणी दिसून येत आहे. येत्या 15 वर्षांत पर्यायी मांसाची बाजारपेठ100 अब्ज डॉलरची होईल, असा जे. पी. मोर्गन चेज या आर्थिक सेवा कंपनीचा अंदाज आहे. बार्कलेज या कंपनीच्या म्हणण्यानुसार, येत्या 10 वर्षांतच पर्यायी मांसाची बाजारपेठ खऱ्या मांसाच्या बाजारपेठेच्या 10 टक्के म्हणजे सुमारे 140 अब्ज डॉलरची होईल.

वास्तविक कृत्रिम मांस ही काही अगदी नवलाईची गोष्टॊ नाही. कृत्रिम मांसाचा शोध लिंडा मॅकर्टनी यांनी सुमारे 20 वर्षांपूर्वी लावला होता. मॅकर्टनी यांनी वनस्पतींच्या पदार्थांचा वापर करून त्यांना मांसाचा स्वाद देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांच्या त्या प्रयोगाला तेव्हा प्रतिसाद मिळाला नव्हता. परंतु लोकांच्या दृष्टीने कृत्रिम मांस ही रोचक गोष्ट होती. विशेषतः ज्या शाकाहारी व्यक्तींना मांसाचा आस्वाद घ्यायचा असेल त्यांच्या दृष्टीने याचे महत्त्व खूप होते.

म्हणूनच इम्पॉसिबल फूड अँड बियाँड मीट यांसारख्या कंपन्यांनी मांसामध्ये ज्या अणूंमुळे खास स्वाद आणि खास रचना येते त्या अणूंचा शोध घेण्यासाठी जीवशास्त्राची मदत घेतली. आज या कंपनीकडे एवढी मागणी आहे, की वनस्पती आधारित मांसाची मागणी ही कंपनी पूरी करू शकत नाही. या कंपनीचे भवितव्य उज्ज्वल असल्याचा गुंतवणूकदारांना विश्वास असल्यामुळेच या कंपनीचा शेअरचा भाव न्यूयार्क शेअर बाजारात पहिल्याच दिवशी 163 टक्क्यांनी वाढून 65.75 डॉलरवर पोचला.

भारतातही कृत्रिम मटन आणि चिकन तयार करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे आणि त्याला सरकारचे पाठबळही लाभले आहे. हे बोनलेस मटन व चिकन अगदी खऱ्या मटन आणि चिकनसारखेच असेल आणि त्याचा स्वाद, रंग व रूप अगदी मूळ मांसासारखे असेल. या अस्थिरहीत मांसाला (बोनलेस मीट) ‘अहिंसा मीट’ या नावाने ओळखले जाईल. या संदर्भात देशातील पहिल्या प्रकल्पाची पायाभरणी तेलंगाणाची राजधानी हैद्राबाद येथे झाली आहे. सेंटर फॉर सेल्यूलर अँड मोलीक्यूलर बायोलॉजी (सीसीएमबी) आणि नॅशनल रिसर्च सेंटर ऑन मीट (एनआरसीएम) यांचे सहकार्य या प्रकल्पाला लाभले आहे. भारत सरकारने यात रस दाखवला असून जैवतंत्रज्ञान खात्याने त्यासाठी 4.5 कोटी रुपयांची मदत दिली आहे. तत्कालीन केंद्रीय पर्यावरणमंत्री मेनका गांधी यांनी सीसीएमबीला पुढील पाच वर्षांत कृत्रिम मांसाची निर्मिती करण्यास सांगितले होते.

हा प्रयोग यशस्वी झाला तर अमेरिकेप्रमाणेच आपल्याकडे कृत्रिम मांसासाठी कंपन्या पुढे येतील. त्यावेळी खऱ्या मांसाला कृत्रिम मांसाची खरी टक्कर मिळेल!

Leave a Comment