निर्भय, निडर आणि बिनधास्त – युवराज सिंग


असं म्हणतात, की प्रत्येक चांगल्या गोष्टीला एक शेवट असतो. त्या प्रमाणे गेली सतरा वर्षे भारतीय क्रिकेटमध्ये तळपणाऱ्या ताऱ्याप्रमाणे अस्तित्व दाखविणाऱ्या युवराज सिंह यानेही क्रिकेटला अलविदा केला. खरे तर युवराज सिंग हा प्रदीर्घ काळापासून भारतीय क्रिकेट संघातून बाहेर होता. त्यामुळे तशी त्याची निवृत्ती ही औपचारिकच म्हणायला हवी. केवळ इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी आपली निवड होईल, या आशेवर त्याने ही घोषणा टाळली होती एवढेच. अखेर ही निवड झाली नाही तेव्हा स्पर्धा सुरू असतानाच त्याने आपण निवृत्त होत असल्याचे जाहीर केले.

युवराजच्या निवृत्तीमुळे भारतीय क्रिकेटमधील एक युग पूर्ण झाले असे म्हणले तरी काही खोटे ठरणार नाही. किंबहुना युवराजसारखा जिगरबाज खेळाडू मिळायला भारतीय संघाला मोठा काळ प्रतीक्षा करावी लागेल. सुनील गावसकर, कपिल देव, सचिन तेंडुलकर किंवा विराट कोहली यांच्या सारखा महान खेळाडू म्हणून युवराजला कधीही ख्याती मिळणार नाही. त्यांच्या सारखे सातत्यही त्याच्या खेळात नव्हेत शिवाय या खेळाडूंप्रमणे त्याची संघातील जागाही पक्की नव्हती. संघातून त्याला अनेकदा बाहेर जावे लागले आणि अशा प्रत्येक वेळी त्याने तितक्याच दमदारपणे पुनरागमनही केली. तरीही आपल्या खेळाने लोकांचे रंजन करणारा आणि बेडरपणे प्रतिस्पर्ध्यांना सामोरे जाणाऱ्या खेळाडूंची जेव्हा गणना करण्यात येईल, तेव्हा युवराजचे नाव अग्रभागी असेल. असे अनेक क्रिकेटपटू आहेत की ज्यांचे आयुष्य हा खेळ खेळताना सरले मात्र त्यांच्या नावावर एकही अविस्मरणीय खेळी नाही. याच्या उलट युवराज नावाच्या दादा खेळाडूच्या नावावर अशा खेळींचा एक खजिनाच आहे.

युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले तेव्हा बहुतेक सर्व संघांमध्ये दिग्गज गोलंदाज होते. ज्यांच्या समोर उभे राहण्यास भय वाटावे असे जलदगती गोलंदाजही होते आणि त्यांच्या तालावर नाचावे लागावे असे फिरकी गोलंदाजही होते. युवराजने या गोलंदाजांचा केवळ बेडरपणे सामनाच केला नाही तर त्यांना अस्मानही दाखवले. युवराजच्या बॅटने पाणी न पाजलेला क्वचितच एखादा गोलंदाज असेल.

केनियात झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत 2000 साली झालेली युवराजची एंट्रीच धमाकेदार ठरली. तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या संघाचा क्रिकेटवर दबदबा होता आणि युवराजने आपला पहिला सामना क्वार्टर फायनलमध्ये खेळला होता. ग्लेन मॅकग्रा, ब्रेट ली, जेसन गिलेस्पी अशा गोलंदाजांसमोर सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली किंवा राहुल द्रविड अशा दिग्गज फलंदाजांचाही पाडाव लागू शकलेला नव्हता. त्यावेळी युवराजने मोर्चा सांभाळला आणि 80 चेंडूंत 84 धावा ठोकल्या होत्या.फिल्डिंग करतानाही मायकल बेव्हन सारख्या फलंदाजाला धावचित करून त्याने भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.

नॅटवेस्ट चषकाचा अंतिम सामना हा तर युवराजच्या कारकीर्दीतीलच नव्हे, तर भारतीय क्रिकेटमधीलही सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा अध्याय होय. त्या संपूर्ण स्पर्धेतच त्याची बॅट तळपली होती मात्र अंतिम सामन्यात मोहम्मद कैफ सोबत त्याने जो पराक्रम केला तो अकल्पनीय होता. इंग्लंडने आपल्यासमोर 325 धावांचे लक्ष्य ठेवले होते. सौरव, सेहवाग, सचिन आणि द्रविड अशा महारथींनी पॅव्हेलियनची वाट धरली होती. आपल्या नावावर 24 षटकांत 146 धावा आणि 5 विकेट होते. उरलेल्या 26 षटकांत 179 धावा करायच्या होत्या. मात्र युवराज-कैफच्या जोडीने ते अशक्यप्राय काम केले. युवराजने 63 चेंडूंत 69 धावा करून पराजयाच्या तोंडातून विजयाचा घास खेचून आणला.

युवराजच्या करियरमध्ये अनेक चढ-उतार आले. मात्र 2011मध्ये त्याची कामगिरी पुन्हा सर्वांचे डोळे दीपवणारी ठरली. भारताने 2011 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकून कपिल देवच्या पराक्रमाची 28 वर्षांनी पुनरावृत्ती केली. या पराक्रमात युवराजचा सिंहाचा वाटा होता कारण त्याच्या नावावर एक शतक व चार अर्धशतकांसह 362 धावांची कमाई होती. तसेच या स्पर्धेत त्याने 15 बळी घेतले. भारताने 2011 च्या विश्वचषक स्पर्धेत एकूण 9 सामने खेळले आणि त्यातील 4 सामन्यांत तो सामनवीर होता. यावरूनच त्याचे कर्तृत्व दिसून येते. या स्पर्धेत तो मालिकावीर म्हणजे मॅन ऑफ दि सीरीज ठरला हे साहजिकच होते.

ही स्पर्धा त्याच्यासाठी आणखी महत्त्वाची होती कारण त्या वेळेस तो कर्करोगाने ग्रस्त होता. तसेच त्याने कर्करोगाशी दिलेला दुर्दम्य लढा आणि त्यावर मात करून मैदानावर ठेवलेला पाय हेही अचंबित करणारे होते आणि इतरांसाठी प्रेरणा देणारे होते.

जो निडरपणा युवराजने मैदानावर दाखवला तोच खासगी जीवनातही बाळगला. नट्यांसोबतची त्याची प्रेम प्रकरणे, पार्ट्या अशा अनेक कारणांनी त्याचे आयुष्य चर्चेचा विषय ठरले. आज या खेळाडूने अलविदा केला असला तरी त्याच्या या बिनधास्त खेळाची आठवण क्रिकेटरसिकांना कायम राहील.

Leave a Comment