पांडा देऊन रशियाला खुश करणार चीन?


दोन देशांतील राजनयिक संबंध सुरळीत करण्यासाठी अनेक मार्गांचा वापर करण्यात येतो. यात खाद्यपदार्थांचे आदानप्रदान, कलाकारांचे दौरे किंवा सांस्कृतिक कार्यक्रम अशा अनेक उपक्रमांचा समावेश आहे. मात्र चीनने आता यात नवीन पाऊल टाकले असून आपल्या पांडा या प्राण्याचा उपयोग राजनयिक संबंधांसाठी करण्याचे ठरविले आहे.

चीनच्या वतीने नुकतेच रशियाला पांडाची एक जोडी भेट देऊन या दिशेने सुरूवात करण्यात आली. रशियाला जायंट पांडाची ही जोडी भेट देणे म्हणजे या दोन देशांमधील राजनयिक संबंधांचा 70 वा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी मैत्रीपूर्ण आणि उत्सवी वातावरण तयार करण्यास मदत करणे होय, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेन्ग शुआंग यांनी मंगळवारी पत्रकारांना सांगितले.

रु यी आणि डिंग डिंग असे या पांडाची नावे आहेत आणि ते रशियामध्ये 15 वर्षे राहणार आहेत. गेल्या 29 एप्रिलला त्यांनी चीनच्या सिचुआन प्रांताचा निरोप घेतला आणि आता ते मॉस्कोतील प्राणिसंग्रहालयात रूळले आहेत, असे शुआंग यांनी सांगितले.

“पांडाची जोडी ही दोन राष्ट्रांमधील मैत्रीचे एक शक्तिशाली प्रतीक आहे,” अशी टिप्पणीही शुआंग यांनी केली. सेंट पीटर्सबर्ग येथे आयोजित आंतरराष्ट्रीय आर्थिक मंचात (एसपीआयईएफ) सहभागी होण्यासाठी चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग यांनी नुकताचा रशियाचा दौरा केला. त्यावेळी त्यांना सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठाच्या वतीने मानद डॉक्टरेटने सन्मानित करण्यात आले तर चीनच्या वतीने मॉस्को प्राणिसंग्रहालयातील पांडा पॅव्हेलियनचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.

जायंट पांडा हा इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर या आंतरराष्ट्रीय संस्थेने दुर्मिळ म्हणून जाहीर केलेला पांडा आहे. हा प्राणी चीनचा अनौपचारिक प्रतीक मानला जातो. वर्ष 2013 च्या अखेरपर्यंत चीनमध्ये एकूण 1,864 जायंट पांडा राहत होते. यापैकी बहुतांश पांडा उत्तर पश्चिम चीनच्या सिचुआन प्रांतातील डोंगराळ जंगलात वास्तव्य करतात आणि बांबूची कोवळी कोंबे खाऊन आपली गुजराण करतात.

याच पांडांचा वापर करून इतर देशांना खुश करण्याची पद्धत चिनी राज्यकर्त्यांनी आजवर वापरली असून ही पद्धत प्राचीन काळापासून सुरू आहे. इ. स. सनाच्या सातव्या शतकात वू झेतिआन या सम्राज्ञीने तत्कालीन जपानी सम्राटाला पांडाची एक जोडी पाठविल्याचे उल्लेख सापडतात.

आधुनिक काळात साम्यवादी रशिया 1948 मध्ये अस्तित्वात आला. तेव्हापासून पांडाचा वापर राजनयिक संबंधासाठी होण्याचे प्रसंग अनेकवार आले. चीनने 1950 च्या दशकापासून अनेकदा पांडा डिप्लोमसीचा वापर केला आहे. या अंतर्गत 1958 ते 1982 पर्यंत चीनने नऊ वेगवेगळ्या देशांना 23 पांडा भेट दिले होते. अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी 1972 साली चीनचा केलेला दौरा हा ऐतिहासिक मानला जातो. त्यावेळी लिंग-लिंग आणि सिंग-सिंग हे दोन पांडा चीनने अमेरिकेला भेट दिले होते. त्यावेळी त्याची खूप चर्चा झाली होती. त्याची परतफेड म्हणून अध्यक्ष निक्सन यांनी दोन कस्तुरी मृग चीनला पाठविले होते. हे पांडा एप्रिल 1972 मध्ये जेव्हा अमेरिकेला पोचले तेव्हा फर्स्ट लेडी पॅट निक्सन यांनी ते वॉशिंग्टन डीसीमधील राष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाला दान केले. पहिल्याच दिवशी ते 20 हजारांहून अधिक लोकांनी या पांडाचे दर्शन घेतले आणि चीनच्या राजनयिक प्रयत्नांचे यश म्हणून त्याकडे पाहिले गेले. चीनची ही चाल एवढी यशस्वी झाली, की ब्रिटनचे पंतप्रधान एडवर्ड हेथ हे 1974 मध्ये चीनच्या भेटीवर गेले असताना त्यांनी ब्रिटनसाठीही पांडा देण्याची मागणी केली. त्या मागणीला दाद देऊन चीनने चिया-चिया आणि चिंग-चिंग हे दोन पांडा लंडन प्राणिसंग्रहालयासाठी पाठवले होते.

जपान, फिनलंड, मलेशिया इत्यादी देशांनाही चीनने आपले पांडा भेट दिले आहेत. मात्र 1984 पासून चीनने पांडा भेट देण्याऐवजी ते दहा वर्षांसाठी उधार देण्यास सुरूवात केली. त्यासाठी संबंधित देशांकडून शुल्कही घेण्यात येते. रशियाला दिलेले पांडा हा त्याच प्रथेचा एक भाग आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर राजनयिक संबंधांसाठी दुर्मिळ प्राणी भेट देण्याच्या घटना घडतात, मात्र त्या क्वचितच. आता अमेरिकेशी व्यापार युद्ध लढत असलेल्या चीनला जागतिक समुदायात मित्रांची गरज आहे. त्यासाठी रशियाशी जवळीक साधण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा जायंट पांडाची मदत घेतली आहे. त्यांना हा पांडा हात देतो का नाही, हे काळच ठरवेल.

Leave a Comment