ब्रह्मांडातले पहिले शिवलिंग – स्थानेश्वर महादेव


हरियानातील कुरुक्षेत्र हे महाभारतकालीन स्थळ येथे घडलेल्या महाभारत युद्धामुळे सर्वाना परिचित आहे. याच ठिकाणी ५ हजार वर्षापूर्वीचे प्राचीन महादेव स्थान असून असे सांगतात कि ब्र्हमाने जेव्हा सृष्टी निर्माण केली तेव्हाच महादेवाचे पहिले शिवलिंग येथे स्थापन केले. याला स्थानेश्वर महादेव असे नाव आहे. हे स्थळ येथील प्राचीन शिवलिंग, प्राचीन वटवृक्ष यामुळे शिवभक्तांसाठी अतिशय पवित्र स्थळ आहे.


अनेक धार्मिक पुस्तके, इतिहासात या स्थळाचा उल्लेख स्वतः ब्रह्माने स्थापन केलेले पहिले शिवलिंग असा आहेच पण असेही सांगतात कि येथेच भगवान श्रीकृष्णाने पाण्डवांसह शिवलिंग पूजा करून महाभारत युद्धात पांडवांना विजयश्री मिळावी असा आशीर्वाद मागितला होता. या मंदिराशेजारी एक भव्य कुंड असून त्यात मधोमध नीलकंठ म्हणजे महादेवाची मोठी मूर्ती आहे. या मंदिराजवळ असलेल्या कुंडातील पाणी दिव्य प्रभावाचे मानले जाते आणि येथे स्नान करणाऱ्या भाविकांची अनेक दुखणी, व्याधी, त्वचा रोग बरे होतात असा भाविकांचा विश्वास आहे.


शिखांचे नववे धर्मगुरू तेगबहादूर सिंग यांनी या मंदिरात काही काळ वास्तव्य केले होते आणि त्यामुळे त्यांची आठवण म्हणून या मंदिराशेजारी गुरुद्वारा बांधला गेला आहे. कुरुक्षेत्रच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांनी या मंदिरात शिवलिंगाचे दर्शन घेतले नाही तर त्यांची यात्रा अपूर्ण राहते असे म्हटले जाते. स्थानेश्वर या नावाचा अर्थ स्थान म्हणजे शिवाचे निवासस्थान असा आहे.

हे शहर सम्राट हर्षवर्धन यांच्या काळात राजधानीचे शहर होते. स्थानेश्वर मंदिर परिसरात असलेला वटवृक्ष ५ हजार वर्षे जुना असल्याचे सांगितले जाते. या वटवृक्षाभोवती नवग्रह व भद्रकालीचे मंदिर आहे. पुराणातील माहितीप्रमाणे ब्रह्मांड निर्माण युगात ब्रह्म देवाने या वृक्षाखाली ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र असे समाज निर्माण केले होते. वामन पुराणात असा उल्लेख आहे कि या वृक्षाचे नुसते दर्शन घेतले तरी मनुष्याचा पाप नाश होतो आणि वृक्षाला स्पर्श केला तर आत्म्याला शांती मिळते.

Leave a Comment