या बेकार अँटीबायोटिकचा इलाज काय?


अँटीबायोटिक अर्थात प्रतिजैविक औषध म्हणजे आपल्याकडे जादूची गोळी मानली जाते. अगदी किरकोळ आजारांपासून गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर संसर्गापासून बचाव करण्यासाठी अँटीबायोटिक औषधांचा वापर होतो. मात्र अति तेथे माती म्हणतात तसेच अँटीबायोटिकबाबतही घडले असून अतिवापरामुळे या औषधांची परिणामकारकताही कमी होत आहे. केवळ भारतच नव्हे तर जगभरातील वैद्यकीय तज्ञांना या समस्येने ग्रासले असून निकामी ठरणाऱ्या या औषधांवर इलाज काय, हा त्यांच्यापुढचा प्रश्न आहे.

भारतात अँटीबायोटिक उत्पादन उद्योगाची 2018 साली उलाढाल 129,015 अब्ज रुपये होती. ती मागील वर्षीच्या तुलनेत 9 टक्क्यांनी वाढली होती. आज मोठ्या शहरांपासून खेड्यापाड्यांपर्यंत अँटीबायोटिक गोळ्या व औषधे मिळतात. सर्दी-पडशासारख्या आजारांवर उपचार म्हणून अँटीबायोटिक गोळ्यांचा सर्रास वापर करण्यात येतो. परंतु रुग्णांच्या दृष्टीने ही औषधे निष्प्रभ ठरत आहेत. या औषधांच्या अतिवापरामुळे अँटीबायोटिक रझिस्टन्सची (प्रतिजैविक प्रतिरोधाची) समस्या वाढत आहे. त्यामुळे माणसांच्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमेतवरही परिणाम होत आहे. अलीकडेच करण्यात आलेल्या संशोधनाने याची पुष्टी केली आहे.

दि इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) ही पाहणी केली असून त्यात 207 निरोगी व्यक्तींचे विश्लेषण केले गेले. या पाहणीच्या अहवालानुसार, दर तीन निरोगी भारतीयांपैकी एक जण अँटीबायोटिक प्रतिरोधक असल्याचे आढळले. ही एक गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्या आहे कारण गंभीर रोगास कारणीभूत असलेल्या जीवाणूंवर सामान्यपणे उपलब्ध असलेल्या अँटीबायोटिक्सचा काहीही परिणाम होत नाही, असे त्यातून दिसते. आयसीएमआरने प्रकाशित केलेल्या अहवालात 139 व्यक्तींमध्ये एक किंवा अधिक प्रकारच्या अँटीबायोटिक्सचे प्रतिरोधक आढळले आहेत.

जे विषाणू पूर्वी सामान्य अँटीबायोटिकला प्रतिसाद देत होते ते आता उच्च क्षमतेच्या अँटीबायोटिकला जुमानत नाहीत. याचा अर्थ असा की जर एखाद्याला काही संसर्ग झाला तर त्याच्यावर काहीही उपचार करता येत नाही किंवा अगदी मोजक्या अँटीबायोटिक्सद्वारेच होऊ शकतील.

असे का होत आहे? डॉक्टरांच्या मते, भारतात अँटीबायोटिक औषधांच्या अनावश्यक वापरामुळे हे घडत आहे. शरीरात अँटीबायोटिक प्रतिरोध निर्माण होण्याचे सर्व सामान्य कारण म्हणजे अगदी ताप आणि सामान्य सर्दी यांसारख्या आजारांकरिता अँटीबायोटिक्सचा सर्रास वापर. इतकेच कशाला, कोंबड्या आणि इतर प्राण्यांमध्ये अँटीबायोटिक्सचा वापर वाढल्यामुळेही हे घडत आहे. कोंबड्या, शेळी इत्यादी प्राण्यांची लवकर वाढ व्हावी यासाठी त्यांच्यावर सर्रास अँटीबायोटिक औषधांचा मारा करण्यात येतो आणि त्या प्राण्यांचे मांस जेव्हा मानवी शरीरात अन्नावाटे जाते तेव्हा ही औषधे प्रतिरोध क्षमता निर्माण करतात. तसेच अँटीबायोटिक औषधींचे जास्त सेवन केल्याने मूत्रपिंडाच्या समस्याही निर्माण होऊ शकतात. गेल्या अनेक वर्षांपासून तज्ञांनी याबाबतचे इशारे दिले आहेत.

ही केवळ भारताची स्थिती नाही, ती जागतिक पातळीवरील समस्या बनली आहे. गरीब आणि श्रीमंत अशा दोन्ही प्रकारच्या देशांमध्ये गंभीर जीवाणूंच्या संक्रमणावरील औषधांच्या विरोधात प्रतिरोध निर्माण होत असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) गेल्या वर्षी दिला होता. डब्ल्यूएचओच्या ग्लोबल अँटीमायक्रोबायल सर्व्हिलन्स सिस्टिमने 22 देशांमधील 500,000 लोकांमध्ये अँटीबायोटिक प्रतिरोध असल्याचे उघडकीस आणले होते. या अहवालाने जगभरात अँटीबायोटिक प्रतिरोधाची स्थिती गंभीर असल्याचे सिद्ध होते, असे डब्ल्यूएचओच्या अँटीमायक्रोबायल रझिस्टन्स सचिवालयचे संचालक डॉ. मार्क स्पेंगर यांनी म्हटले होते.

एवढेच नव्हे, तर अँटीबायोटिक वापरावर निर्बंध आणले नाही, तर वैद्यकीय क्षेत्र पुन्हा मध्ययुगीन काळात लोटले जाईल, अशी भीती ‘लॅन्सेट इन्फेक्शिअस डिसीजेस जर्नल’ या वैद्यकीय नियकालिकात काही वर्षांपूर्वी व्यक्त करण्यात आली होती.

यावर उपाय काय? तर याचा मुकाबला करण्याचा एक मार्ग म्हणजे कुक्कुटपालनासारखे अन्न उद्योग आणि सामान्य जनतेत प्रतिजैविक वापराचे नियमन करणे. हे काम जनजागृती आणि शिक्षणातूनच होऊ शकते. या संकटाचा सामना करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे औधषी दुकानांतून विक्री केल्या जाणाऱ्या औषधांवर कडक निर्बंध आणणे. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिपनशिवाय औषधे देण्यास मनाई करणे. रुग्णांनी आपल्या मनानेच पुन्हा-पुन्हा औषधे घेणे किंवा डॉक्टरांचा सल्ला न घेता मित्रांना आणि कुटुंबियांना ती औषधे घेण्याचा सल्ला देण्यापासून परावृत्त करणे. अँटीबायोटिक्सचा वापर विवेकबुद्धीने आणि केवळ आवश्यकता असेल तेव्हाच व्हावा, असे तज्ञांचे म्हणणे आहे.

Leave a Comment