रोममधील या कारंज्याचे दर्शन घेण्यासाठी पर्यटकांना पाळावे लागतात हे नियम.


जगामध्ये अनेक पर्यटनस्थळे अशी आहेत, जिथे भेट देताना पर्यटकांना काही नियमांचे पालन करणे बंधनकारक असते. असेच काही नियम इटलीतील रोम या ठिकाणी देखील काही पर्यटनस्थळी लागू करण्यात आले आहेत. यातील काही नियम विशेषतः पुरुषांसाठी लागू केले गेले आहेत. रोम येथील ऐतिहासिक ट्रेवी फाउंटन या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांसाठी अनेक नियम अंमलात आणले गेले असून, रोमच्या सिटी कौन्सिल द्वारे हे नवे नियम पारित करण्यात आले आहेत.

दर वर्षी येथे लाखोंच्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांच्या असामाजिक वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही नवी नियमावली अंमलात आणली गेली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांना जबर दंड केला जाण्याचे प्रावधान या नियामवलीच्या अंतर्गत देण्यात आले आहे. तसेच नियमबाह्य वर्तन करणाऱ्या पर्यटकांना ट्रेवी फाउंटन येथे येणास मनाई करण्याचे प्रावधानही या नियमांच्या अंतर्गत देण्यात आले आहे.

पूर्वी ट्रेवी फाउंटन येथे येणारे पर्यटक या कारंज्यातील पाणी पीत असत, किंवा पिण्यासाठी भरून घेत असत. आता अंमलात आणलेल्या नव्या नियमावलीच्या अनुसार पर्यटकांना या कारंज्यातील पाणी भरून घेण्यास किंवा पिण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच पुरुषांसाठी शर्टाची बटणे उघडी टाकून हिंडण्यासही मनाई करण्यात आली आहे. जर एखादा पुरुष या ठिकाणी शर्ट काढून उघड्याने हिंडताना आढळल्यास त्याच्यावर दंड ठोठाविला जाण्याचे प्रावधान या नव्या नियमावलीमध्ये आहे.

ट्रेवी फाउंटनच्या परिसरामध्ये नाश्ता करण्यास मनाई करण्यात आली असून, या नियमाचे पालन होत आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी या ठिकाणी पोलीसांचा कडक पहारा असणार आहे. ट्रेवी फाउंटनचा नाही, तर रोममधील इतर अनेक ऐतिहासिक पर्यटनस्थळांसाठी हे नियम लागू करण्यात आले असून, पर्यटकांचे असभ्य वर्तन आणि पर्यटनस्थळी अस्वच्छता पसरविण्याची प्रवृत्ती पाहता ही नवी नियमावली लागू करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.

Leave a Comment