चीनमधील या तुरुंगातील कैद्यांना आता करता येणार ऑनलाईन खरेदी


सर्व सामान्यपणे तुरुंगवासाची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांसाठी अन्न, पाणी, कपडे, प्राथमिक आरोग्यसेवा इत्यादी सुविधा पुरविण्यात येत असताना दक्षिण चीनमधील गुआंगडोंग प्रांतातील तुरुंगामध्ये कैद्यांना आता ऑनलाईन खरेदीची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून, याद्वारे त्यांच्या आवश्यकतेनुसार वस्तू कैद्यांना आता कारागृहामध्येच मागविता येणार आहेत.

या नव्या आणि आगळ्या उपक्रमाच्या अंतर्गत कैद्यांना दर महिन्यामध्ये एकदा तीन हजार रुपयांपर्यंत किंमतीच्या वस्तूंची खरेदी ऑनलाईन करण्याची मुभा देण्यात आली असून, खरेदी करताना पासवर्ड किंवा बायोमेट्रिकच्या द्वारे लॉग-इन करून ही ऑनलाईन खरेदी करता येणार आहे. हा उपक्रम यंदाच्या वर्षी जानेवारी ते एप्रिल या महिन्यांमध्ये प्रायोगिक पातळीवर सुरु करण्यात आला असून, गुआंगडोंग कारावास प्रशासनिक कार्यालयाच्या वतीने कोंगहुआ कारावासामध्ये हा उपक्रम राबविण्यात आल होता. त्यावेळी कैद्यांकडून तेरा हजार ऑर्डर्सच्या माध्यमातून ऑनलाईन खरेदी करण्यात आली होती. या खरेदीसाठी सुमारे चार लाख रुपये खर्च करण्यात आले होते. ऑनलाईन खरेदीचा हा उपक्रम प्रायोगिक पातळीवर अतिशय सफल झाल्यानंतर आता चीनमधील गुआंगडोंग प्रांतातील सर्व कारागृहांमध्ये ही सुविधा कायमस्वरूपी पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या कारागृहांमधील प्रत्येक मजल्यावरील एक वॉर्ड ऑनलाईन शॉपिंग टर्मिनल्सनी सुसज्ज असून, या द्वारे कैदी, दैनिक आवश्यकतेकच्या वस्तू, सिगारेट्स, भेटवस्तू यासारख्या ६८ प्रकारच्या वस्तूंच्या निरनिराळ्या श्रेणींमधून दोनशे वस्तूंची खरेदी ऑनलाईन करू शकतात. खरेदी करण्यापूर्वी आपल्याला खरेदी करायच्या वस्तूंची लेखी यादी कैद्यांनी कारावासातील अधिकाऱ्यांकडे सुपूर्त करणे गरजेचे असते. त्यानंतर हे अधिकारी कैद्यांनी दिलेल्या यादीप्रमाणे वस्तूंची ऑर्डर ऑनलाईन देत असून, या वस्तू आल्यानंतर कैद्यांकडे पोहोचविल्या जात असतात. ही सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी काही दिवसांचा अवधी खर्च होत असतो.

Leave a Comment