या विश्वविद्यालयाने विकसित केली ढोबळ्या मिरचीची नवी प्रजाती


शिमला मिरची प्रमाणेच दिसणारी, पण आकाराने लहान आणि शिमला मिरचीच्या मानाने अधिक पौष्टिक अशी ढोबळ्या मिरचीची एक नवी प्रजाती सोलन येथील नौणी विश्वविद्यालयामध्ये विकसित करण्यात आली असून, या मिरचीच्या प्रजातीचे नामकरण ‘सोलन मिरची’ असे करण्यात आले आहे. ही सोलन मिरची दिसायला शिमला मिरची प्रमाणे असली, तरी याचा स्वाद शिमला मिरचीपेक्षा अधिक चविष्ट, आणि पोषणतत्वे यामध्ये शिमला मिरचीच्या मानाने अधिक असल्याचे म्हटले जात आहे. या मिरचीच्या सेवनाने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळत असल्याचेही सांगण्यात येत आहे.

या मिरचीचे उत्पादन हवामान आणि मातीच्या कसाला जास्त साजेसे असून, शिमला मिरचीच्या उत्पादनाला लागते त्यापेक्षा कमी निगेची आणि भांडवलाची आवश्यकता सोलन मिरचीसाठी आवश्यक असल्याचे कृषी तज्ञांच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्यामुळे कमी खर्चामध्ये अधिक उत्पन्न देणारी अशी ही मिरचीची प्रजाती असल्याचे समजते. या मिरचीची रोपे सहजासहजी खराब होणारी नसून, या रोपांच्या निरोगी वाढीसाठी कीटकनाशकांचा जास्त वापर करण्याची आवश्यक नाही. तसेच या मिरचीवर एखादा आजार पसरण्याचा किंवा याला कीड लागण्याचा धोकाही नगण्य असल्याचे कृषी तज्ञांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

ही मिरची तोडून घरामध्ये ठेवल्यास ही जास्त काळ ताजी, टिकून राहणारी असून, या मिरचीमध्ये अनेक औषधी गुण आहेत. या मिरचीमध्ये असलेली अँटी कार्सिनोजेनिक तत्वे कर्करोग रोखणारी आहेत. तसेच या मिरचीमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, अ, क आणि इ जीवनसत्वे मुबलक प्रमाणामध्ये असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे. गेली अनेक वर्षे नौणी विद्यापीठाच्या वनस्पती विज्ञान विभागामध्ये सुरु असलेल्या संशोधनाच्या फलस्वरूप सोलन मिरचीची ‘ओपन पॉलिनेटेड’ प्रजाती विकसित करण्यात आली असून, या मिरचीच्या सेवनाने शरीरातील लोहाची कमतरता दूर होणार असून, लिव्हर आणि त्वचा निरोगी राहण्यास मदत होणार असल्याचे वैज्ञानिकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

या मिरचीच्या उत्पादनाला प्रोत्साहन मिळवून देण्याकरिता नौणी विद्यापीठातर्फे शेतकऱ्यांना या मिरचीच्या बियाणांचे वाटप करण्यात आले असून, एप्रिल महिन्यामध्ये या बियाणांच्या रोपणाचे काम पूर्ण झाले आहे. या मिरचीचे सर्वाधिक उत्पादन सोलन जिल्ह्यामध्ये होणार असून, सिरमौर, शिमला, चंबा, मंडी या ठिकाणच्या शेतकऱ्यांनीही या बियाणांची रोपणी केली आहे.

Leave a Comment