‘टॉय स्टोरी – ४’ने प्रदर्शनापूर्वीच केली लाखोंची कमाई


यंदाच्या वर्षीचा जून महिना हा भारतीय चित्रपट रसिकांच्या करीता मोठ्या धमालीचा असणार आहे. या महिन्यामध्ये तमाम बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित होत असून, पाच जून रोजी सलमानच्या ‘भारत’सोबत ‘एक्समेन-डार्क फिनिक्स’ हा चित्रपटही दर्शकांच्या भेटीला आला आहे. चौदा जून रोजी ‘एमआयबी इंटरनॅशनल’ प्रदर्शित होणार असून, त्यापुढील शुक्रवारी सुपरहिट ‘टॉय स्टोरी’ या चित्रपट मालिकेचा चौथा भाग प्रदर्शित होत आहे. या चित्रपट मालिकेचा प्रत्येक भाग अतिशय गाजला असून, आता प्रदर्शित होत असणाऱ्या चौथ्या भागाची सर्व रसिक मोठ्या उत्सुकतेने वाट पहात आहेत.

या चित्रपट कथेतील प्रमुख पात्रे असलेले ‘वूडी’ आणि ‘बझ’ यांना या चित्रपटामध्ये अनेक नवी मित्रमंडळी भेटणार आहेत. त्यामुळे जुन्या आणि नव्या मित्रमंडळींच्या सोबतीने वूडी आणि बझचा प्रवास या चित्रपटामध्ये दर्शकांना पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट प्रदर्शित होताच सुपरहिट ठरणार असल्याचे बोलले जात असतानाच, प्रदर्शनापूर्वी या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगच्या द्वारे जमविलेली रक्कम आताच लाखोंच्या घरात जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित होत असेलेल्या पहिल्याच वीकएंडचला हा चित्रपट भरघोस कमाई करणार असल्याचे दिसत आहे.

अॅनिमेशन चित्रपट करीत असलेल्या व्यवसायावर लक्ष ठेऊन असलेल्या फिल्म क्रिटीक्सच्या मतानुसार टॉय स्टोरी -४ या चित्रपटाने एकट्या अमेरीकेमधेच ओपनिंग वीकएंडला सुमारे वीस कोटी डॉलर्सचा गल्ला जमविणे अपेक्षित असून, ही रक्कम ‘इन्क्रेडीबल्स -२’ ने केलेल्या अठरा कोटींच्या रक्कमेपेक्षा अधिक असणे अपेक्षित आहे. तिकीट विक्री करणाऱ्या ‘फँडागो’ नामक कंपनीच्या अनुसार या चित्रपटासाठीचे अॅडव्हान्स बुकिंग खुले झाल्यानंतर चोवीस तासांच्या आतच या तिकिटांची विक्रमी बुकिंग झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. या अॅनिमेशन चित्रपटातील पात्रांसाठी सुप्रसिद्ध हॉलीवूड अभिनेते टॉम हँक्स, टिम अॅलन, क्रिस्टीना हेंड्रिक्स, कियानू रीव्ह्स, कीगन मायकल, जॉर्डन पेले यांसारख्या मातब्बर कलाकारांच्या आवाजातील संवाद दर्शकांना ऐकता येणार आहेत.

Leave a Comment