खोट्या बातम्यांना कोण जबाबदार?


सध्याच्या काळात सोशल मीडियामुळे अफवा व खोट्या बातम्या प्रसृत करण्याचे गैरप्रकार वाढले आहेत. खोट्या बातम्या ही एक मोठी डोकेदुखी ठरली आहे. खासकरून भारतात जिथे फेसबुकचे 30कोटींच्या जवळपास तर व्हाटस् ॲपचे 20 कोटींपेक्षा जास्त वापरकर्ते आहेत, अशा ठिकाणी हा धोका जास्तच आहे. इतक्या मोठ्या लोकसंख्येकडून वापरले जाणारे हे माध्यम प्रचंड शक्तिशाली झाले आहे. त्यामुळे त्याबद्दल सगळेच चिंता व्यक्त करतात.

बनावट बातम्या किंवा दिशाभूल करणाऱ्या गोष्टींची हाताळणी कशी करावी, यावरून राजकारणी, नागरी हक्क संघटना आणि तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये विचारमंथन सुरू आहे. खासकरून अमेरिका आणि युरोपमधील लोकशाही संस्थांना कमकुवत करण्यासाठी रशिया आणि इतरांकडून अपप्रचाराच्या मोहिमा राबविल्याचे आरोप झाल्यानंतर अनेकांनी त्या दिशेने प्रयत्न केला आहे.

विविध देशांतील सरकारांनी खोट्या बातम्यांना आळा घालण्यासाठी अनेक कायदे केले आहेत. अगदी दोन दिवसांपूर्वीत श्रीलंका सरकारने नवीन कायदा करून खोट्या बातम्या व चिथावणीकारक भाषणे रोखण्याच्या दृष्टीने एक पाऊल टाकले आहे. या नवीन कायद्यांतर्गत सोशल मीडियावर चुकीची माहिती आणि द्वेष पसरवणाऱ्या आरोपींना 5 वर्षे तुरूंगवासाची शिक्षा आणि 10 लाख श्रीलंकन रूपये (3.92 लाख भारतीय रुपये) दंड ठोठावण्यात येणार आहे. श्रीलंकेत 21 एप्रिल रोजी झालेल्या ईस्टर हल्ल्यानंतर सोशल मीडियावरून खोट्या बातम्या आणि अफवा पसरविण्याच्या प्रकारांची चर्चा झाली होती. त्यामुळे अनेक ठिकाणी मुस्लिमांवर हल्ले झाले होते. म्हणून सरकारने हे पाऊल उचलले आहे.

तसेच सिंगापूर सरकारनेही खोट्या बातम्या रोखण्यासाठी मागील महिन्यात एक कायदा केला होता. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याला 10 वर्षांचा तुरुंगवास आणि आर्थिक दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

मात्र या खोट्या बातम्यांचा उगम नक्की कोठून होतो आणि त्या कोण पसरवतो, याची फारशी चर्चा होत नाही. सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने पाहिले तर यासाठी राजकीय नेते व कार्यकर्ते हेच प्रमुख कारण आहेत.

अमेरिकेत नुकत्याच करण्यात आलेल्या एका पाहणीत अर्ध्याहून अधिक प्रौढ व्यक्तींनी खोट्या बातम्यांबद्दल राजकारणी आणि कार्यकर्त्यांना दोष दिला आहे.

प्यू रिसर्च सेंटर या संस्थेने हे सर्वेक्षण केले असून बुधवारी ते जाहीर करण्यात आले. त्यात 68% प्रौढांनी खोट्या बातम्यांमुळे सरकारी संस्थांवरील विश्वास डळमळीत होतो, असे सांगितले. लिंगवाद, वंशवाद, बेकायदा स्थलांतर किंवा दहशतवाद यांपेक्षाही खोट्या बातम्या ही मोठी समस्या असल्याचे या लोकांनी सांगितले. यात 57% लोकांनी खोट्या माहितीसाठी राजकीय नेत्यांना आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना जबाबदार धरले तर 53% जणांनी कार्यकर्त्यांना जबाबदार धरले आहे. विशेष म्हणजे खोट्या बातम्यांच्या या रोगाचे निर्मूलन करण्याची जबाबदारी पत्रकारांची आहे, असे यातील बहुतेकांना वाटते.

ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी ऑफ एसेक्स या विद्यापीठाचे संशोधक सायन बॅनर्जी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी असेच एक संशोधन केले होते. या पथकाने देशातील 18 मतदारसंघांत पाच आठवडे संशोधन केले. यात उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि झारखंडमधील ग्रामीण भागांचा समावेश होता. व्हाट्सअपसारख्या सोशल मीडियावरील फॉरवर्ड होणाऱ्या खोट्या बातम्यांचा लोकांवर कसा परिणाम होतो, जातीय हिंसा आणि सार्वजनिक धोरणांवर काय परिणाम होतो, याचा अभ्यास त्यांनी केला.

बॅनर्जी यांच्या मते, खोट्या बातम्या केवळ आधीपासून असलेल्या राजकीय विचार आणि मतांना पुष्टी देतात. त्यातून कोणाचे मत परिवर्तन केले जाता येत नाही. अमेरिकेच्या संशोधकांनीही आधी असाच निष्कर्ष काढला होता. खोट्या बातम्या हा केवळ एक उत्प्रेरक असून तो आपल्या आत लपलेला दानव बाहेर काढतो, असेही त्यांचेम्हणणे आहे.

म्हणूनच भारताला या गोष्टीची जरा जास्तच काळजी घ्यावी लागणार आहे. कारण भारतात केवळ सोशल मीडियाचे वापरकर्तेच सर्वात जास्त संख्येने नाही तर इच्छुक राजकीय नेत्यांची संख्याही जास्त आहे. म्हणूनच व्हॉट्सअ‍ॅप आणि अन्य सोशल साईटवरून खोट्या बातम्या व्हायरल झाल्यामुळे देशात अनेक हिंसक घटना घडल्या. मुलांचे अपहरण करणारी टोळी आली, अशी अफवा पसरल्यामुळे जमावाच्या मारहाणीत अनेकांचा मृत्यू घडला.

या खोट्या बातम्यांचा स्रोत शोधण्यासाठी लवकरात लवकर पावले उचलावीत आणि भारतात आपले कार्यालय उघडावे अशा सूचना केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी गेल्या वर्षी व्हॉट्सअ‍ॅपला दिल्या होत्या. व्हॉट्सअ‍ॅपचे मुख्य कार्यकारी अधिकारी ख्रिस डॅनियल यांच्याशी झालेल्या भेटीत प्रसार यांनी ही सूचना केली होती. मात्र त्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. व्हॉट्सअ‍ॅपवरून व्हायरल होणाऱ्या अफवा, खोट्या बातम्या आणि अश्लिल संदेशांना आळा घालण्यासाठी तांत्रिक उपाय शोधण्यासही रविशंकर प्रसाद यांनी तेव्हा सांगितले होते. मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. ती लवकरात लवकर झाली तरच या दानवाला काही प्रमाणात तरी अंकुश लावता येईल.

Leave a Comment