लंडन येथे सुरु होत आहे जगातील पहिला वहिला ‘इन्फिनिटी पूल’


जगातील पहिल्या वहिल्या इन्फिनिटी पूलमध्ये जलतरणाची संधी आता लंडन शहरामध्ये लवकरच उपलब्ध होणार असून, या प्रकल्पाच्या डिझाइन्सची छायाचित्रे अलीकडेच प्रसिद्ध करण्यात आली आहेत. ही छायाचित्रे पाहिल्यानंतर या पूलमध्ये पोहण्याचा अनुभव किती चित्तथरारक असेल याची आपल्याला सहज कल्पना येईल. ‘सीएनएन’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताच्या अनुसार या पूलची क्षमता ६००,००० लिटर्स असून, ‘इन्फिनिटी पूल’ असे याचे नामकरण करण्यात आले आहे. या स्विमिंग पूलची डिझाईन्स ‘कंपास पूल्स’ च्या वतीने प्रसिद्ध करण्यात आली असून हा स्विमिंग पूल एका पंचावन्न मजली इमारतीवर बांधण्यात येणार आहे. या स्विमिंग पूलच्या कडेच्या भिंती आणि तळ पारदर्शक असणार असून या इमारतीमध्ये येणाऱ्या सर्वांना आकाशाचे आणि अर्थातच स्विमिंग पूलचे आणि पर्यायाने स्विमिंग पूलमध्ये पोहणाऱ्या मंडळींचेही खुले दर्शन घडणार आहे.

हा स्विमिंग पूल डिझाईन करताना पूलमधून खाली पाहताना खालची संपूर्ण इमारत आणि इमारतीमध्ये खाली उभे असणाऱ्याला पूलच्या वरले आकाशही स्पष्ट दिसावे अशा बेताने या पूलचे डिझाईन तयार करण्यात आले असल्याचे ‘कंपास पूल’चे प्रमुख डिझायनर आणि टेक्निकल अॅडव्हायझर अॅलेक्स केम्सली यांनी सीएनएन शी बोलताना सांगितले. अशा या आगळ्या वेगळ्या पूलमधील पाण्यामध्ये उतरण्यासाठी आणि पूलमधून बाहेर येण्यासाठी जिना तयार करणे आपल्यापुढले मोठे आव्हान असल्याचेही केम्सली यांनी सांगितले. इतक्या असाधारण पूलसाठी साधी शिडी लावल्याने पूलची शोभा नक्कीच कमी झाली असती, त्यामुळे या पूलसाठी हटके शिडीची योजना करणे अपरिहार्य होते. त्यामुळे एका सबमरीनच्या दरवाजाला एक गोलाकार शिडी लावून, पोहण्यासाठी पाण्यात उतरताना आणि पोहून बाहेर येताना ही शिडी पूलच्या तळापासून गोलाकार फिरत बाहेर येईल असे डिझाईन तयार केले गेले असल्याचे केम्सली यांनी सांगितले.

थंडीच्या दिवसांमध्ये इमारतीतील एअर कंडिशनिंग सिस्टममधील अतिरिक्त उर्जा वापरून पूलमध्ये हिटिंग सिस्टम चालविण्यात येणार असून, या द्वारे पूलचे पाणी गरम करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. लंडनमध्ये हा इन्फिनिटी पूल नेमक्या कोणत्या इमारतीमध्ये तयार करण्यात येत आहे ही गोष्ट अद्याप उघड करण्यात आली नसली, तरी या आगळ्या वेगळ्या पूलच्या संकल्पनेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

Leave a Comment