अमरनाथ यात्रा- अशी असावी तयारी


यंदाच्या वर्षी अक्षय्य तृतीयेच्या आसपास केदारनाथ आणि बद्रीनाथ धामांच्या यात्रांना सुरुवात झाली. आता लवकरच अमरनाथ धामाच्या यात्रेलाही लवकरच सुरुवात होत असून, या यात्रेसाठी दर वर्षी देश-विदेशातून अनेक भाविक हजारोंच्या संख्येने येथे येत असतात. ही यात्रा अतिशय खडतर म्हणून ओळखली जात असून, अवघड डोंगराळ भागातून या यात्रेचा मार्ग जातो. तरीही इतक्या खडतर यात्रेच्या शेवटी होणाऱ्या अमरनाथ बाबांच्या दर्शनाच्या ओढीने हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने दर वर्षी या यात्रेमध्ये सहभागी होत असतात. ही यात्रा सर्व सामान्य यात्रांच्या पेक्षा वेगळी असल्याने या यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी काही विशेष तयारी करणे आवश्यक असते. तसेच या यात्रेसाठी काही खास नियमही असून यांचे पालन करणे ही बंधनकारक असते.

यंदाच्या वर्षी अमरनाथ यात्रा एक जुलै पासून सुरु होत असून या यात्रेसाठी जाण्याची इच्छा असणाऱ्या यात्रेकरूंना यात्रा सुरु होण्याच्या महिनाभर आधीपासून नावनोंदणी करावी लागते. ही नावनोंदणी झाल्यानंतर यात्रेकरूंना यात्रा करण्यासाठी अधिकृत संमतीपत्र देण्यात येते. या यात्रेसाठी जाताना येथील हवामान लक्षात घेणे अतिशय महत्वाचे असते. येथील हवामान अतिशय अस्थिर असून अकस्मात हवामान पालटू शकते. म्हणूनच यात्रेकरूंनी आपल्यासोबत आवश्यक गरम कपडे, रेनकोट, हातमोजे, पायमोजे, एखादे जॅकेट, गरम टोपी इत्यादी कपडे घेणे अगत्याचे असते. ही यात्रा डोंगराळ भागातून करायची असल्याने महिला यात्रेकरूंसाठी साडीच्या ऐवजी सलवार कमीज घालणे सोयीचे ठरत असते. त्याचप्रमाणे यात्रेकरूंनी आपल्यासोबत कोरडे अन्नपदार्थ ही बरोबर ठेवणे इष्ट असते.

यात्रेला सुरुवात होण्यापूर्वी यात्रेच्या दरम्यान यात्रेकरूंनी पालन करण्याच्या नियमांची नियमावली अमरनाथ बोर्डद्वारे प्रसिद्ध केली जात असते. या सूचना व्यवस्थित वाचून घेणे महत्वाचे असते. यात्रेसाठी जाताना यात्रेकरूंनी आवश्यक ती औषधे बरोबर न्यावीत. तसेच बहुतेक वेळा यात्रेमध्ये पायी चालावे लागत असल्याने किंवा खेचरावर बसून यात्रा करायची असल्याने अंगामध्ये तंग कपडे परीद्धान न करता सैल, आरामदायक कपडे परिधान करण्याला प्राधान्य दिले जावे. यात्रेचा मार्ग डोंगराळ भागातून जात असल्याने पायांमध्ये चपला किंवा सँडल परिधान न करता चांगली ‘ग्रिप’ असलेले बूट किंवा ट्रेकिंग शूज परिधान करावेत. यामुळे निसरड्या वाटांवर पाय घसरून पडण्याचा धोका पुष्कळ अंशी कमी होतो. यात्रेचा मार्ग निश्चित असल्याने त्या व्यतिरिक्त इतर मार्गांनी जाण्याचा प्रयत्न करणे धोकादायक ठरू शकते. यात्रेच्या मार्गावर ठिकठीकाणी अनेक सूचना फलक लावलेले असून या फलकांवर लिहिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक असते. यात्रेकरूंची सोय आणि सुरक्षितता लक्षात घेऊनच या सूचना लिहिल्या जात असतात, त्यामुळे त्या सूचनांकडे यात्रेकरूंनी दुर्लक्ष न करणे इष्ट ठरते.

Leave a Comment