पुढच्या वर्षीच्या ‘ईद’ला खिलाडी-भाईजानचा आमना-सामना


‘ईद’च्या मुहूर्तावर सलमान खानचे बरेचसे चित्रपट रिलीज केले जातात. नुकताच ‘ईद’च्या दिवशी त्याचा ‘भारत’ चित्रपटदेखील रिलीज झाला. प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद या चित्रपटाला मिळत आहे. नुकतीच त्याच्या आगामी ‘इंशाल्लाह’च्या रिलीजची तारीख जाहीर करण्यात आली आहे. पुढच्या वर्षी ‘ईद’च्या दिवशी हा चित्रपटदेखील रिलीज होणार आहे. पण अक्षय कुमार आणि सलमान खानच्या चित्रपटांची आता पुढच्या वर्षी ‘ईद’च्या दिवशी टक्कर होताना दिसणार आहे. कारण, याच दिवशी रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि अक्षय कुमार अभिनीत ‘सूर्यवंशी’ चित्रपटदेखील रिलीज होणार आहे.

या चित्रपटाच्या निमित्ताने अक्षय कुमार आणि रोहित शेट्टी पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. या चित्रपटाचे सध्या बँकॉक येथे शूटिंग सुरू आहे. या चित्रपटाच्या रिलीजची तारीख काही दिवसांपूर्वीच जाहीर झाली. अक्षय कुमार या चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहे. तर, त्याच्यासोबत चित्रपटात कतरिना कैफ हिदेखील दिसणार आहे.

संजय लीला भन्साळीसोबत तब्बल २० वर्षानंतर सलमान खान हा काम करणार आहे. ‘हम दिल दे चुके सनम’नंतर आता ‘इंशाल्लाह’ या चित्रपटासाठी दोघे एकत्र आले आहेत. तर, आलिया भट्ट ही त्याच्यासोबत या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चाहत्यांमध्ये या दोन्हीही चित्रपटाबद्दल उत्सुकता पाहायला मिळते. त्यामुळे आता पुढच्या वर्षी एकाच दिवशी जर हे दोन्हीही चित्रपट थिएटरमध्ये धडकले, तर प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद या चित्रपटांना मिळेल, हे पाहणे महत्वाचे ठरेल.

Leave a Comment