पाक पंतप्रधान इम्रान खान यांचे नरेंद्र मोदींना पत्र


नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये त्यांनी काश्मीरसह दोन्ही देशांसाठी अनुकूल असलेल्या अन्य मुद्यांवर चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मोदी-इम्रान खान यांची किरगिझस्तानात ‘शांघाय सहकार्य संघटने’च्या शिखर बैठकीच्या पार्श्वभूमीवर भेट होणार अशी चर्चा होती. पण भारताने अशी कुठलीही भेट होणार नाही हे स्पष्ट केल्यानंतर इम्रान खान यांनी हे पत्र लिहिले आहे.

आपल्या पत्रात इम्रान खान यांनी पंतप्रधान मोदींना दुसऱ्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दोन्ही देशातील जनतेला गरीबीतून बाहेर काढण्यासाठी चर्चा हा एकमेव मार्ग आहे. दोघांनी प्रादेशिक विकासासाठी एकत्र काम करणे आवश्यक आहे. काश्मीरसह सर्व समस्यांवर समाधान शोधण्याची पाकिस्तानची इच्छा असल्याचे या पत्रात म्हटले आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान मोदी यांची फेरनिवड झाल्यानंतर दुसऱ्यांदा एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दोन्ही देशांमध्ये पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर कमालीचा तणाव निर्माण झाला होता. युद्धापर्यंत परिस्थिती पोहोचली होती. हा तणाव अजूनही निवळलेला नाही. पाकिस्तानच्या बालकोटमधील जैशच्या तळावर भारताने एरियल स्ट्राइककरुन या हल्ल्याला उत्तर दिले होते.

Leave a Comment