ममता बॅनर्जींना बळ देणार प्रशांत किशोर?


प्रशांत किशोर….सुमारे पाच वर्षांपूर्वी हे नाव प्रत्येकाच्या तोंडी होते. नरेंद्र मोदी यांच्या गुजरातच्या मुख्यमंत्र्यापासून देशाच्या पंतप्रधानपदापर्यंतच्या प्रवासात प्रशांत किशोर यांचा मोठा वाटा असल्याचे मानले जाते. त्यानंतर प्रशांत यांनी टोपी फिरविली आणि त्यांनी नीतीश कुमार यांना बिहारमध्ये विजय मिळवून दिला. मग ते राहुल गांधी यांच्या छावणीत शिरले आणि उत्तर प्रदेश विधानसभेसाठी त्यांनी काँग्रेसची रणनीती ठरविली. मात्र तिथे अपयश आल्यानंतर त्यांना कोणी विचारेनासे झाले व त्यांनी थेट राजकीय पक्षात घरोबा केला. ते नीतीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाचे उपाध्यक्ष झाले. गेल्या काही निवडणूकांमध्ये त्यांनी आपल्या कामाची छाप सोडली होती.

याच प्रशांत किशोर यांनी नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीतही एक मोठी जबाबदारी पार पाडली. आता ते आणखी एक महत्त्वाची कामगिरी पार पाडण्यास सज्ज झाले आहेत. आंध्र प्रदेशात झालेल्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसने मोठे यश मिळविले. या यशात प्रशांत किशोर यांचीही महत्त्वाची भूमिका होती. ती कामगिरी फत्ते करून आता ते बंगालमध्ये ममता बॅनर्जींना बळ देण्याची शक्यता आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणुकीचे रणनीतीकार आणि संयुक्त जनता दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असलेल्या प्रशांत किशोर यांची नुकतीच भेट घेतली. कोलकाता येथील राज्य सचिवालयात मुख्यमंत्री बॅनर्जी यांच्यासह तृणमूलचे खासदार आणि बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्याशी प्रशांत यांनी सुमारे अडीच तास चर्चा केली. बॅनर्जी यांची इच्छा असेल तर प्रशांत हे त्यांच्या सोबत काम करण्यास तयार आहेत, अशी तयारीही त्यांना दाखवली. त्यामुळे प्रशांत किशोर हे आता ममता बॅनर्जी यांच्यासाठी काम करतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

दरम्यान, या भेटीबद्दल ममता बॅनर्जी यांनी माध्यमांशी काहीही बोलण्यास नकार दिला. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनीही याबाबत मौन बाळगले आहे.
राज्यात भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय वर्चस्वासाठी भीषण संघर्ष सुरू असून त्याला रक्तपाताचीही जोड मिळाली आहे. त्यातच पश्चिम बंगालमध्ये 2021 मध्ये राज्य विधानसभेच्या निवडणुका आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पश्चिम बंगालमध्ये एकूण 42 लोकसभा मतदारसंघांपैकी 18 मतदारसंघांत विजय मिळविला आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसपेक्षा ही संख्या केवळ चारने कमी आहे. या विजयामुळे उत्साहित झालेल्या भाजपने राज्य विधानसभा निवडणुकीत ममतांना सत्तेतून खाली खेचणे हेच आमचे ध्येय असल्याचे म्हटले आहे.

प्रशांत आणि ममतांची ही भेट त्या पार्श्वभूमीवर झाली असून या निवडणुकीत प्रशांत हे तृणमूल काँग्रेसचे रणनीतिकार म्हणून काम करण्याची शक्यता आहे. राज्यात भाजपचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी आणि बंगालवर तृणमूलचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी ते या पक्षाला मदत करतील.

भाजपने 2014 मध्ये मिळविलेल्या विजयामुळे प्रशांत किशोर चर्चेत आले. नरेंद्र मोदी यांनी तेव्हा “चाय पे चर्चा’ आयोजित करून मतदारांना आकर्षित केले होते. मोदींनी अशी चर्चा करून लोकसभा निवडणुकीत वातावरण निर्मिती केली होती. त्यामागचे कर्ते धर्ते प्रशांत किशोर हे होते. त्याच प्रमाणे उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राहुल गांधी यांना त्यांनी खाट सभा घेण्याचा सल्ला दिला. त्यातून काँग्रेसला फारसे राजकीय यश मिळाले नाही, मात्र त्या उपक्रमाची मोठी चर्चा झाली होती. त्यामुळे निवडणुकीतले चाणक्य अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती.

गेल्या वर्षी त्यांनी संयुक्त जनता दलात पद घेतले असले तरी ते पक्षात नाराज आहेत. आपली नाराजी त्यांनी उघडपणे ट्विटरवर प्रदर्शित केली होती. एकप्रकारे यंदाच्या लोकसभा निवडणूक प्रक्रियेपासून त्यांनी स्वत:ला दूर ठेवले होते. उलट आजही ते आपली सेवा अनेक राजकीय पक्षांना देतात. अगदी अलीकडे आंध्रात चंद्राबाबू नायडू यांना पराभूत करण्यासाठी त्यांनी जगनमोहन रेड्डी यांना मदत केली होती. त्यामुळे प्रशांत किशोर हे बिहारी डाकू असल्याची टीका चंद्राबाबू नायडू यांनी केली होती. “बिहारच्या या डाकूने लाखो मते तोडली,” असे ते म्हणाले होते.

असे हे प्रशांत किशोर आता बंगालकडे वळत आहेत. त्यामुळे भाजपच्या कपाळावरील आठ्या वाढणार, हे नक्की.

Leave a Comment