पाकचा नमाज आयसीसीला चालतो मग धोनीचे ग्लोज का चालत नाही


विश्वचषक स्पर्धेतील पहिलाच सामना भारतीय संघाने सहा गडी राखून जिंकला. रोहित शर्माच्या नाबाद शतकाबरोबरच धोनीच्या खास ग्लोजचीही या सामन्यानंतर चांगलीच चर्चा झाली. पण या सामन्यात धोनीने वापरलेले पॅरा कमांडोजच्या पॅराशूट युनिटचे सन्मानचिन्ह असणारे ग्लोज वापरू नयेत असे आदेश आयसीसीने बीसीसीआयला दिले आहेत. पाकिस्तानी वंशाचे लेखक तारेक फतेह यांनी आयसीसीच्या याच आदेशावरुन पाकिस्तानी संघाचा मैदानात नमाज चालतो तर धोनीने ग्लोज घातल्यास त्यात चुकीचे काय असा सवाल उपस्थित केला आहे. यासंदर्भात फतेह यांनी ट्विट करुन आपली भूमिका मांडली आहे.

फतेह यांनी धोनीच्या ग्लोज प्रकरणासंदर्भात दोन ट्विट केले आहेत. ते आपल्या पहिल्या ट्विटमध्ये म्हणतात, भारतीय संघाचा यष्टीरक्षक लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंह धोनीला त्याच्या ग्लोजवरुन लष्कराचे सन्मानचिन्ह काढण्यास आयसीसीने सांगितले आहे. हे ग्लोज धोनीने वापरले पाहिजेत. बीसीसीआयने या प्रकरणामध्ये धोनीच्या पाठिशी उभे रहायला हवे. इस्लामिक पद्धतीनुसार विश्वचषकामध्ये दाढी मिशा चालतात. धोनीच्या ग्लोजची कोणालाही अडचण नसावी.


फतेह यांनी आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये पाकिस्तानी संघाचा एक जुना फोटो ट्विट केला आहे. संपूर्ण पाकिस्तानी संघ यामध्ये क्रिकेटच्या मैदानातच नमाज पठण करताना दिसत आहे. फतेह हा फोटो ट्विट करताना म्हणतात, पाकिस्तानी संघ मैदानात प्रार्थना (नमाज पठण) करतो याबद्दल आयसीसीला काहीच आक्षेप नाही. ख्रिस्ती आणि ज्यू लोकांना या प्रार्थनेमध्ये कमी लेखले जाते. फक्त धोनीने घातलेल्या ग्लोजवरील बलिदान चिन्हाचे आयसीसीला वावडे आहे.


अनेक नेटकऱ्यांनी फतेह यांच्याबरोबर या प्रकरणात धोनीच पाठराखण केली आहे. धोनीने पुढील सामन्यातही ‘बलिदान’ असा संदेश देणारे चिन्ह असलेले ग्लोव्ह्ज वापरावेत अशी गळ नेटकऱ्यांनी धोनीला घातली आहे. #DhoniKeepTheGlove हा हॅशटॅग ट्विटरवर टॉप ट्रेण्डींग असून अनेकांनी हा हॅशटॅग वापरून धोनीच्या या कृतीचे समर्थन केले आहे. आपल्या देशाच्या सैन्याप्रती धोनीने दाखवलेले हे प्रेम असून त्यात काहीच चूक नसल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment