तुम्ही दररोज किती प्लॅस्टिक खाता?


पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी प्लॅस्टिकमुक्ती आवश्यक आहे, असे नेहमी सांगितले जाते. महाराष्ट्रातही सरकारने प्लॅस्टिक बंदी कायदा केला आहे. मात्र हे झाले दिसणाऱ्या प्लॅस्टिकबाबत. त्यापेक्षाही घातक अशी गोष्ट आता समोर येत असून ती म्हणजे मायक्रोप्लॅस्टिक!

मायक्रोप्लॅस्टिक याचा अर्थ मानवाने बनविलेले प्लॅस्टिकचे छोटे छोटे तुकडे. सध्याच्या काळात ही एकमेव अशी वस्तू आहे जी पृथ्वीवर सर्वत्र आढळून येते. मग ते सिंथेटिक कपड्यांचे तुकडे असोत किंवा कारच्या टायर अथवा काँटॅक्ट लेन्स अशा रोजच्या वापरातील वस्तू असोत. जगातील सर्वात उंच भागातील पर्वतशिखरांपासून समुद्राच्या तळापर्यंत ही गोष्ट सर्वत्र मिळते. त्यामुळेच या वस्तूचा फैलाव सगळीकडे झाला असून तिचा मानवी शरीरावरही परिणाम होत असल्याचे समोर आले आहे.

जगातील प्रत्येक मनुष्य दरवर्षी 10 हजार मायक्रोप्लॅस्टिकचे तुकडे खातो किंवा श्वासाच्या माध्यमातून आपल्या शरीरात घेतो, असे ताज्या संशोधनाने दाखवून दिले आहे. त्यामुळे प्लॅस्टिक कचरा आपल्या आरोग्यावर किती घातक परिणाम करतो, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

माणसाच्या अन्न साखळीत मायक्रोप्लॅस्टिक कशा पद्धतीने प्रवेश करू शकते, हे गेल्या काही दिवसांतील संशोधनातून समोर आले आहे. गेल्या वर्षी तर अनेक प्रसिद्ध ब्रँडच्या सीलबंद बाटल्यांमध्ये विकल्या जाणाऱ्या पाण्यातही प्लॅस्टिकचे तुकडे आढळले होते.

अलीकडेच कॅनडातील शास्त्रज्ञांनीही मायक्रोप्लॅस्टिकबाबत विश्लेषण केले आणि अमेरिकी लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयीशी त्याची तुलना केली. त्या आधारे त्यांनी असा निष्कर्ष काढला, की एक प्रौढ व्यक्ती एका वर्षात मायक्रोप्लॅस्टिकचे सुमारे 52,000 आपल्या शरीरात घेऊ शकतो. उदाहरणार्थ, ज्या प्रकारे प्रदूषित हवेत आपण जगत आहोत त्यात केवळ श्वासावाटेच 1.21 लाख मायक्रोप्लॅस्टिक कण शरीरात जाऊ शकतात. म्हणजेच दर दिवशी सुमारे 320 प्लॅस्टिकचे तुकडे. याशिवाय एखादी व्यक्ती बाटलीबंद पाणी पीत असेल तर त्याच्या शरीरात सुमारे 90,000 प्लॅस्टिकचे तुकडे जाऊ शकतात. एन्व्हायर्मेंटल सायन्स अँड टेक्नॉलॉजी नावाच्या नियतकालिकात हे संशोधन प्रकाशित झाले आहे.

अर्थात ही केवळ आकडेवारी असू शकते, असे या संशोधकांनी म्हटले आहे. एखादी व्यक्ती कुठे राहतो आणि कोणत्या जागी राहतो, यावर त्याच्या शरीरात प्लॅस्टिकचे किती कण जातील, हे अवलंबून असेल असे त्यांचे म्हणणे आहे. इतकेच नाही तर माणसाच्या शरीरावर मायक्रोप्लॅस्टिकचा काय परिणाम होतो, हेही आतापर्यंत नीटसे कळालेले नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र 130 मायक्रोमीटरपेक्षा छोटे प्लॅस्टिकचे कण माणसाच्या पेशींमध्ये जाऊन शरीराच्या त्या भागाची प्रतिकारक्षमता कमी करू शकते, असा इशारा संशोधकांनी दिला आहे. आपल्या फुफ्फुसांपर्यंत व पोटात किती मायक्रोप्लॅस्टिक जाते हे समजण्यासाठी आणखी संशोधनाची गरज असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

ही झाली विकसित देशांची स्थिती. आपल्या भारतात तर परिस्थिती आणखीच भीषण आहे. कागदावर तरी देशातील अनेक राज्यांमध्ये प्लॅस्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. त्यासाठी लोकांनी प्लॅस्टिकच्या थैल्या व अन्य वस्तूंचा वापरही टाळला तरीही सूक्ष्मरूपाने प्लॅस्टिक आजही जेवणावाटे पोटात जात असल्याचा निष्कर्ष गेल्याच वर्षी काढण्यात आला होता. चक्क आपण घरात वापरत असलेल्या मिठामध्ये प्लॅस्टिकचे सूक्ष्म कण शास्त्रज्ञांना आढळले आहेत.

आयआयटी मुंबईतील सेंटर ऑफ एन्व्हायरनमेंटल सायन्स ऍण्ड इंजिनीअरिंग विभागातील शास्त्रज्ञांच्या दोन पथकाने हे संशोधन केले होते. त्यात त्यांना विविध कंपन्यांच्या मिठाच्या नमुन्यांमध्ये प्लॅस्टिकचे 626 सूक्ष्म कण आढळले. त्यात 63 टक्के प्लॅस्टिकचे कण होते, तर 37 टक्के प्लॅस्टिकचे तंतू होते. प्रत्येक व्यक्तीने रोज 5 ग्रॅम मीठ खावे, असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने दिलेला आहे. या प्रमाणानुसार पाहिले तर भारतातील प्रत्येक व्यक्तीच्या पोटात दरवर्षी 0.117 मिलिग्रॅम प्लॅस्टिक मिठातून जाते, असे म्हणता येईल. जागतिक पातळीवर चीन आणि अमेरिकेनंतर भारत हा तिसरा मीठ उत्पादक देश आहे. त्यामुळे आयआयटी मुंबईने केलेल्या या संशोधनाचे महत्त्व समजून येते.

जगातील अन्य देशांमध्येही मिठावर अशा प्रकारचे संशोधन झाले आहे. मागील चार वर्षांत झालेल्या संशोधनांमध्ये चीन, अमेरिका, इंग्लंड, स्पेन, तुर्की, फ्रान्स आदी देशांमधील मिठाच्या नमुन्यांमध्ये प्लॅस्टिकचे सूक्ष्म कण आणि तंतू आढळले आहेत.

हे सगळे पाहिले तर आपण दररोज किती प्लॅस्टिक गिळंकृत करतो याची आपल्यालाच चिंता वाटायला लागतो. यावर काही उपाययोजना झाली नाही तर मानवजातीचे भवितव्यच संकटात यायचे!

Leave a Comment