देशाचे आर्थिक बजेट तयार करणार ही ‘कोर टीम’


लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल घोषित झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नव्या मंत्रिमंडळाने पदभार स्वीकारीत कामाला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर बजेट सत्राची घोषणाही अगोदरपासूनच करण्यात आल्याने पाच जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन जुलै २०१९ ते मार्च २०२० या नव्या आर्थिक वर्षासाठी बजेट सादर करणार आहेत. या बजेटसाठी अर्थ मंत्रालयामध्ये आतापासूनच तयारी सुरु झाली असून काही विशेष सभासदांची ‘कोर टीम’ तयार करण्यात आली आहे. बजेट तयार करण्याचे काम या कोर टीमच्या मदतीने केले जात आहे.

या कोर टीम मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या समवेत वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांचाही समावेश आहे. देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांचा या कोर टीम मध्ये समावेश असून, हे अतिशय निष्णात अर्थशास्त्रज्ञ समजले जातात. कृष्णमूर्ती इंडियन स्कूल ऑफ बिझिनेसमध्ये सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत असून, आयआयटी आणि आयआयएम सारख्या प्रख्यात शैक्षणिक संस्थांमधून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे. सुब्रमण्यम यांनी शिकागो येथून डॉक्टरेट घेतली असून, जगातील सर्वोत्तम बँकिंग, कॉर्पोरेट गव्हर्नन्स, आणि इकोनॉमिक पोलिसी एक्स्पर्ट्समध्ये त्यांची गणना केली जाते.

१९८४च्या बॅचचे आयएएस अधिकारी अजय भूषण पांडेय यांचा समावेशही कोर टीममधे करण्यात आला आहे. पांडेय सध्या वित्तमंत्रालयामध्ये सचिवपदी कार्यरत आहेत. त्यापूर्वी पांडेय युआयडीएआय (UIDAI) चे सीइओ म्हणून कार्यरत होते. ‘जीएसटी’ हा पांडेय यांचा विशेष अभ्यासाचा विषय आहे. १९८३च्या बॅचचे आयएएस अधिकारी आणि सध्या वित्त सचिव म्हणून कार्यरत असलेले सुभाष चंद्र गर्ग सध्या अर्थ मंत्रालयामध्ये विदेशी निवेश, कॅपिटल मार्केट बजेट आणि इन्फ्रास्ट्रक्चर फायनॅन्सची कामे पहात आहेत. तत्पूर्वी गर्ग वर्ल्ड बँकमध्ये कार्यकारी निर्देशक म्हणून कार्यरत होते.

त्याचप्रमाणे सचिव अतानु चक्रवर्ती यांचाही कोर टीममध्ये समावेश करणायत आला असून, ते पेट्रोलियम मंत्रालयाच्या हायड्रोकार्बन विभागाचे महानिदेशक म्हणून कार्यरत होते. बिझिनेस फायनान्स या विषयामध्ये त्यांचा अभ्यास दांडगा आहे. व्यय सचिव गिरीश चंद्र मुर्मू आणि वित्तीय सेवा सचिव राजीव कुमार यांचा समावेशही कोर टीममध्ये करण्यात आला आहे. व्यय सचिव म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी मुर्मू गृहमंत्रालयामध्ये सचिव म्हणून कार्यरत असून, त्यांनी पीएमओ म्हणूनही काम केले आहे, तर राजीव कुमार सध्या वित्त मंत्रालयामध्ये वित्तीय सेवा सचिव म्हणून कार्यरत आहेत.

Leave a Comment