एसआरए घोटाळ्यात राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता दोषी


मुंबई: एम. पी. मिल कंपाऊंड एसआरए घोटाळ्यात लोकायुक्तांनी राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना दोषी ठरविल्याची माहिती समोर आली आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात प्रकाश मेहतांच्या चौकशीचे आदेश दिले होते.

प्रकाश मेहता यांच्यावर ताडदेवमधील एम. पी. मिल कम्पाऊंड येथील एसआरए प्रकल्पात विकासकाच्या फायद्यासाठी नियम डावलून विकासकाला एफएसआय अन्यत्र वापरास मंजुरी दिल्याचा आरोप आहे. ही फाइल मंजूर करताना मेहता यांनी मुख्यमंत्र्यांना अवगत केल्याचा शेरा मारला होता. पण हे प्रकरण बाहेर आल्यानंतर मेहता यांनी चुकून हा प्रकार घडल्याची सारवासारव केली होती. विधानसभेत यावरून जोरदार हंगामा झाला होता. हा मुद्दा विरोधकांनी लावून धरत प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. पण हे प्रकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीसाठी लोकायुक्तांकडे पाठवले होते.

लोकायुक्तांनी त्यानुसार राज्य सरकारला सादर केलेल्या अहवालात मंत्री म्हणून मेहता यांनी आपली जबाबदारी निष्पक्ष पार पाडली नसल्याचे नमूद करण्यात आल्यामुळे आता प्रकाश मेहता यांच्यासमोरील अडचणी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वाढल्या आहेत. दरम्यान,आता मिस्टर क्लीन अशी प्रतिमा असणारे मुख्यमंत्री यावर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी फडणवीस सरकारमधील काही मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. पण, या मंत्र्यांना फडणवीस यांनी परस्पर क्लीन चीट देऊन टाकल्याचा आक्षेप विरोधकांकडून कायम घेतला जातो.

Leave a Comment