कुठे गेले भारताचे 20 रणझुंजार?


भारतीय हवाई दलाचे रशियन बनावटीचे एएन-३२ हे लढाऊ विमान सोमवारी दुपारपासून बेपत्ता झाले आहे. हे विमान शोधण्याची मोहीम आणखी व्यापक करण्यात आली आहे. विमानाच्या तपासासाठी नौदल व इस्रोचीदेखील मदत घेण्यात आली. या विमानात 13 जण होते आणि त्यांच्या जीविताबाबत आता भीती निर्माण झाली आहे. युद्ध नसतानाही हकनाक भारतीय जवानांचा जीव जाण्याची घटना घडली आहे. मात्र यामुळे याआधी रहस्यमयरीत्या दिसेनाशा झालेल्या 20 भारतीय जवानांच्या स्मृती जागवल्या गेल्या आहेत.

भारतीय सीमांच्या रक्षणासाठी तैनात असलेले 20 योद्धे अनेक वर्षांपासून बेपत्ता आहेत आणि आजवर त्यांचा काहीही थांगपत्ता लागलेला नाही. या बहाद्दरांबाबत काय घडले, याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. परराष्ट्र मंत्रालयाने सुमारे तीन वर्षांपूर्वी माहिती अधिकार कायद्यांतर्गत या संदर्भात माहिती दिली होती. त्यानुसार 1996 पासून 2010 या 14 वर्षांमध्ये सीमेलगतच्या भागात तैनात असलेले 20 जवान नाहिसे झाले आहेत. यातील अनेक जवान एकाच दिवशी आणि एकाच ठिकाणाहून नाहिसे झाले आहेत. त्यांच्या बेपत्ता होण्याचे कारण आणि सध्याची स्थिती याबाबत मंत्रालयही अनभिज्ञ आहे.

या माहितीतील तपशीलानुसार, दिल्लीतील शालीमार बाग येथील रहिवासी आणि 11 इंजीनियर रेजिमेंटचे कॅप्टन अविनाश कुमार शर्मा 16 ऑगस्ट 1996 रोजी जम्मू कश्मीरमधील अखनूर सेक्टरमधून नाहिसे झाले.

जम्मू कश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील कृष्णाघाटी येथून एकाच दिवशी चार भारतीय जवान बेपत्ता झाले होते. तो दिवस होता 12 ऑगस्ट 1996. नेपाळच्या गंडकी भागातील रहिवासी आणि भारतीय लष्कराच्या गोरखा रायफल्सचे हवालदार भूपेंद्र बहादुर थापा हे त्यातील पहिले जवान. तसेच भारताच्या सीमेच्या रक्षणासाठी तैनात असलेल्या गोरखा रायफल्सच्याच बहादुर थापा या नेपाळी नागरिकाबाबतही असेच घडले. नेपाळच्याच लुंबिनी भागातील रहिवासी आणि गोरखा रायफल्सचे नायक हर्क बहादुर राणा हेही याच दिवशी आणि कृष्णाघाटीतूनच नाहिसे झाले. देहरादूनचे रहिवासी आणि गोरखा रायफल्सचे जवान लान्स नायक राजू गुरूंग हेही याच ठिकाणी आणि याच दिवशी बेपत्ता झाले आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या या यादीत पुण्यातील कॅप्टन संजीत भट्टाचार्जी यांचाही समावेश आहे. ते 27 एप्रिल 1997 रोजी कच्छच्या रणातून नाहिसे झाले. गोरखा रायफल्सचेच लान्स नायक राम बहादुर थापा हेही 27 एप्रिल 1997 रोजी कच्छच्या रणातून बेपत्ता झाले आहेत. राजस्थानातील अलवरचे रहिवासी आणि 286 मीडियम रेजीमेंटचे जीएनआर वीरेंद्र सिंह हे 17 ऑक्टोबर 1998 रोजी काकसर सेक्टरमधून नाहिसे झाले आहेत. जम्मू कश्मीरमधील कठुआचे रहिवासी आणि 8 जम्मू अँड कश्मीर लाईट इन्फ्रंट्रीचे गोपाल दास हे 20 ऑगस्ट 2000 रोजी जम्मू कश्मीरमधील पूंछ सेक्टरमधून बेपत्ता झाले.

केरळच्या कोट्टायम येथील रहिवासी आणि 5131 एएससी बीएनचे लान्स नायक जोस जेम्स हे 15 जून 2003 रोजी कारगिलच्या शिंगरो नदी येथून नाहिसे झाले. तमिळनाडूतील तिरुवल्लूर येथील रहिवासी आणि 6 इंजीनियर रेजिमेंटचे कृष्ण कुमार हे 8 ऑगस्ट 2003 रोजी उरी सेक्टरमधून बेपत्ता झाले आहेत. पश्चिम बंगालच्या हावडा येथील रहिवासी आणि 539 एएससी बीएनचे महेश पात्र हे 8 जुलाई 2005 रोजी जम्मू कश्मीरमधून बेपत्ता झाले आहेत.

उत्तर प्रदेशातील फिरोजाबादचे रहिवासी आणि 539 एएससी बीएनचे लान्स नायक शैलेशकुमार शुक्ला हे 8 जुलै 2005 रोजी जम्मू कश्मीरमधून बेपत्ता झाले. उत्तराखंडमधील रूद्रप्रयागचे रहिवासी आणि 234 एईआर यूनिटचे नायक संदीप सिंह हे 26 एप्रिल 2006 पासून जम्मू कश्मीरमधून बेपत्ता झाले. उत्तराखंडमधील हल्द्वानीचे रहिवासी आणि 17 महार रेजीमेंटचे विक्रम सिंह हे 5 ऑगस्ट 2006 रोजी बटालिक येथून नाहिसे झाले. याच रेजिमेंटचे पश्चिम बंगालच्या दार्जिलिंगमधील रहिवासी शिपाई बिष्णु राय हे 5 ऑगस्ट 2006 रोजीच बटालिक येथून नाहिसे झाले.

हवालदार रंजीत कुमार हे 15 बिहार रेजीमेंटचे जवान 6 ऑगस्ट 2010 रोजी सियाचिन येथून नाहिसे झाले. त्याच दिवशी आणि त्याच रेजिमेंटचे राकेश कुमार हेही सियाचिन येथून बेपत्ता झाले. तेही पाटण्याचेच रहिवासी होते. लडाख स्काऊट्स रेजिमेंट सेंटरचे रायफलमन सेवांग दोरजई आणि रायफलमन करमा नामागिल हे 6 ऑगस्ट 2010 रोजी लेह येथून बेपत्ता झाले. हे दोघेही लेह येथे राहत होते.

ताज्या विमान अपघातामुळे जवानांच्या क्षेमकुशलाची काही माहिती देशवासियांसमोर येईलही. मात्र या बेपत्ता जवानांबाबत मात्र तशी काहीच शक्यता नाही. त्यांना शत्रूने काही इजा केली किंवा अपघात झाला, हेही कळायला मार्ग नाही. आणखी किती बहाद्दर वीर अशा रीतीने बेपत्ता होतील, हेही सांगता येत नाही. सगळेच अनिश्चित!

Leave a Comment