या ठिकाणी तोफेच्या धमाक्याने सुरु होतो आणि संपतो ‘रोजा’


रमजान ईदचा सण नुकताच पार पडला. रमजानच्या निमित्ताने सर्व मुस्लिम बांधव संपूर्ण महिनाभर ‘रोजा’ ठेवत असतात. सकाळी सूर्योदयापासून सुरु झालेला हा रोजा सायंकाळी सूर्यास्तानंतर संपतो. सकाळी सूर्योदयापासून सुरु होणाऱ्या रोजाच्या पूर्वी घेतल्या जाणाऱ्या भोजनाला ‘सेहरी’ म्हटले जाते, तर सायंकाळी रोजा सोडताना घेतल्या जाणाऱ्या भोजनाला ‘इफ्तार’ म्हटले जाते. मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यामध्ये रमजानच्या रोज्यांच्या सोबत आणखी एका आगळ्या परंपरेचे पालन गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. आजही रमजानच्या काळामध्ये ‘इफ्तार’ आणि ‘सेहरी’च्या वेळी तोफेचा धमाका ऐकू येत असतो.

भल्या पहाटे तोफ ऐकू आल्यानंतर सेहरीपासून सुरु झालेला रोजा सायंकाळी सूर्यास्तानंतर तोफ ऐकून इफ्तारने संपतो. मध्य प्रदेशातील भोपाल आणि सिहोर जिल्ह्यांमध्येही ही परंपरा अस्तित्वात होती, पण काळ बदलला तशी ही परंपरा लयाला गेली. रायसेन जिल्ह्यामध्ये मात्र आजही अनेक वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा अस्तित्वात आहे. रायसेनच्या किल्ल्यावर ही तोफ अस्तित्वात असून, किल्ल्याला तोफेच्या धमाक्याने नुकसान होऊ नये म्हणून पूर्वी वापरल्या जाणाऱ्या मोठ्या तोफेच्या ऐवजी आत लहान तोफ वापरली जाते असते.

रमजानच्या उपवासाला सुरुवात होताना आणि उपवास (रोजा) सोडताना तोफ डागण्याची पद्धत अठराव्या शतकामध्ये अस्तित्वात आली. त्याकाळी शहराचे ‘काझी’ या तोफांची देखभाल करीत असत. आजच्या काळामध्ये रायसेनमध्ये असलेल्या तोफेलाही सरकारी परवाना देण्यात येत असून, हा परवाना रमजानच्या एका महिन्यापुरता देण्यात येत असतो. ही तोफ डागण्यासाठी आवश्यक असलेल्या दारू गोळ्यासाठी एका महिन्यामध्ये सुमारे चाळीस हजार रुपये खर्च केले जात असून, यातील सुमारे पाच हजार रुपये स्थानिक प्रशासनाच्या वतीने देण्यात येत असतात. बाकी खर्च लोकांकडून वर्गणी गोळा करून त्यातून जमलेल्या रकमेतून केला जात असतो.

रमजानच्या महिन्यामध्ये सेहरीपूर्वी आणि इफ्तार पूर्वी तोफ डागण्याची जबाबदारी दर वर्षी रायसेनचे निवासी असलेल्या सखावत उल्लाह यांना दिली जात असून, तोफ डागण्याच्या वेळेपूर्वी अर्धा तास सखावत उल्लाह किल्ल्यावर पोहोचून तोफेमध्ये दारूगोळा भरण्याचे काम करतात. गावातील मशिदीतून सूचना मिळताच तोफ डागली जाते. सखावत उल्लाह यांच्यासाठी ही जबाबदारी अतिशय मोलाची असल्याचे ते म्हणतात.

Leave a Comment