भारताला मिळाला चाबहारचा ‘मेवा’


भारतात सर्वत्र ईद साजरी केली जात असताना या ईदची खुशी वाढविणारी आणखी एक घटना घडली आहे. भारताच्या सुरक्षेच्या आणि विकासाच्या दृष्टीने अत्यंत मोलाची असलेली ही घटना अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. ईराणमधील चाबहार बंदराच्या मार्गाने अफगाणिस्तानचा सुका मेवा भारताच्या किनाऱ्याला लागणे, ही ती घटना.

अफगानिस्तानातून आलेला 80 टन सुका मेवा चाबहार बंदरातून भारताला निर्यात करण्यात आला, असे अफगाणिस्तानच्या वाणिज्य कक्षाच्या प्रभारी अधिकारी खान जान अलकूजी यांनी सोमवारी सांगितले. अफगाणिस्तानातून सुका मेवा येणे आणि तो भारताकडे पाठविण्याची ही दुसरी घटना आहे, असे त्यांनी सांगितले. अशा प्रकारची पहिली खेप या वर्षीच्या सुरूवातीस आली होती. म्हणजेच या मार्गाने आता जलवाहतूक सुरळीतरीत्या सुरू झाली आहे, असा याचा अर्थ.

अफगानिस्तानातून या प्रकारचा माल पहिल्यांदाच इतक्या स्वस्तात भारताला पाठविण्यात आला, असे अफगानिस्तानच्या वाणिज्य कक्षाचे प्रवक्ते समीर रसा यांनी सांगितले. तसा अफगाणिस्तानातून आपल्याकडे सुका मेवा, केशर, हस्तकलेच्या वस्तू, संगमरवर इत्यादी माल नेहमीच पाठवला जातो. मात्र मध्ये पाकिस्तान आणि चीन आडमुठेपणा करत असल्यामुळे हा माल आपल्याला वळवून आणावा लागतो. त्यात वेळही जातो आणि या मालाची किंमतही वाढते.

म्हणूनच इराणचे अध्यक्ष डॅाक्टर हसन रूहानी, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ गणी यांच्या उपस्थितीत तीन देशांमध्ये वाहतुकीच्या संदर्भात करारावर 2016 मध्ये स्वाक्षरी झाली होती. त्यामुळे चाबहार बंदराच्या माध्यमातून मध्य आशियातील महत्त्वाच्या देशांशी तसेच अफगाणिस्तानशी दळणवळण करणे भारताला सोपे झाले. शिवाय पाकिस्तानला वगळून भारतीय मालाला थेट अफगाणिस्तान, मध्य आशिया आणि पूर्व युरोप बाजारपेठ गाठता येणार आहे. तसेच इराणमध्ये गॅस अर्थात वायू आणि वीज स्वस्त असून आपल्या देशात गॅसचा तुटवडा आहे. इराणमधून या ऊर्जेच्या वस्तू आयात करणेही आपल्याला सोपे होणार आहे.

आपल्या दृष्टीने महत्त्वाची बाब ही आहे, की इराणमधील हे बंदर भारताच्या सहकार्याने बनले आहे. हिंद महासागरातील इराणच्या सीस्तान आणि बलूचिस्तान प्रांतात हे बंदर आहे आणि भारताच्या पश्चिम सागरी किनाऱ्यावरून तेथे सहज पोचता येते. तसेच पाकिस्तानमध्ये चीन उभारत असलेल्या ग्वादर बंदराला उत्तर म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जाते. या वर्षीच्या जानेवारीत चाबहार आणि भारतातील मुंबई व कांडला आणि मुंद्रा बंदरांमध्ये लाईनर सेवा सुरू करण्यात आली होती. या लाईनर सेवेच्या पहिल्या टप्प्यात 3700 टन कंटेनर भरून माल घेऊन भारताचे एक जहाज शहीद बहिश्ती बंदरावर पोचले होते.

इतकेच नव्हे तर या बंदराच्या मार्गातून आपण थेट रशियापर्यंत रेल्वेने जाऊ शकणार आहोत. भारत आणि रशियाला जोडणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण परिवहन मार्ग (इंटरनॅशनल नॉर्थ-साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर) या नावाने ओळखण्यात येते. भारतातून रशियापर्यंत जाणाऱ्या या रेल्वेमार्गाचे बांधकाम सध्या सुरू आहे. याशिवाय हा मार्ग इराण, अजरबैजान आणि रशिया यांनाही जोडेल. परंपरागत समुद्री मार्गाशी तुलना करता या कॉरीडॉरद्वारे युरोपसमवेत होणाऱ्या व्यापारासाठीच्या वेळात आणि खर्चात सुमारे 50 टक्के कपात होऊ शकते. पुढे जाऊन भारताने हिंदी महासागर क्षेत्र आणि दक्षिण-पूर्व आशियाच्या सहकार्याने विकसित केलेल्या भू आणि समुद्री मार्गांनाही हा मार्ग जोडता येऊ शकेल.

या योजनेची कल्पना 2000 मध्ये मांडण्यात आली होती. त्यावेळी रशिया, भारत आणि इराणने मिळून हा मार्ग सुरू करण्याचे ठरवले होते. हा आंतरराष्ट्रीय रेल्वेमार्ग मुंबईपासून सुरू होतो. तेथून एक रेल्वे जहाजमार्गे इराणच्या चाबहार बंदरापर्यंत किंवा अब्बास बंदरापर्यंत येते. तेथून ती जमिनीवरून कॅस्पियन सागरावरील इराणी बंदरापर्यंत येते आणि तेथून समुद्रमार्गे आस्त्रखनपर्यंत जाते व तेथून रशिया व उत्तर यूरोपपर्यंच पोचते. या 7200 किलोमीटर मार्गाचे बांधकाम अद्याप सुरू असून नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कारकीर्दीत त्याला वेग मिळेल, अशी आशा आहे.

हा प्रकल्प पूर्ण झाल्यास भारतातून जाणारा माल रशियापर्यंत पोचण्यासाठी लागणारा वेळ तीन आठवड्यांनी कमी होईल. सध्या हा वेळ सहा आठवड्यांपेक्षा जास्त आहे. म्हणजेच सध्या सुमारे दोन महिने लागणारा वेळ एक महिन्यांपर्यंत खाली येईल.

म्हणूनच हा सुका मेवा भारतात येणे ही साधीसुधी गोष्ट ठरत नाही. एका मोठ्या आणि उज्ज्वल भविष्याची ती नांदी आहे. चाबहारचा हा मेवा ईदच्या चंद्राएवढाच भारताला महत्त्वाचा आहे.

Leave a Comment