लोकसभेमध्ये पहिल्या वहिल्या ‘इनिंग्ज’साठी नवनिर्वाचित नेते मंडळी सज्ज


लोकसभेच्या ५४२ जागांसाठी झालेल्या निवडणुकांमध्ये मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावीत आपल्या आवडत्या नेत्यांना विजयी करवून संसदेपर्यंत पोहोचविले आहे. यंदाच्या निवडणुकांमध्ये तीनशे हून अधिक उमेदवार प्रथमच निवडून आले असल्याने राजनीतीतील त्यांच्या पहिल्या वहिल्या इनिंग्जला आता सुरुवात होत आहे. या नवनिर्वाचित नेतेमंडळींमध्ये अनेक क्षेत्रांतील व्यक्तींचा समावेश आहे. यांमध्ये काही सिनेसृष्टीतील लोकप्रिय कलाकार आहेत, काही डॉक्टर्स आहेत, तर काही चार्टर्ड अकाऊन्टन्ट्स ही आहेत. यामध्ये प्रामुख्याने नाव घेतले पाहिजे ते म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या अमित शहा यांचे. शहा यांनी प्रथमच गुजरातमधील गांधीनगरमधून निवडणूक लढविली असून आता ते प्रथमच लोकसभेमध्ये भारताचे गृह मंत्री म्हणून दिसणार आहेत. तत्पूर्वी २०१७ साली शहा यांना राज्यसभेचे सभासदत्व देण्यात आले होते. १९८६ पासून भारतीय जनता पक्षासाठी कार्यरत असलेले शहा गुजरातचे गृहराज्यमंत्री म्हणून ही कार्यरत होते.

बंगाली चित्रपट आणि छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री मिमी चक्रवर्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरली होती. तृणमूल काँग्रेसकडून निवडणूक लढविलेल्या मिमीने भाजपाच्या अनुपम हाजरा यांचा तीन लाख मतांनी पराभव करीत लोकसभेमध्ये स्थान मिळविले आहे. महाराष्ट्रातील शिरूर येथून निवडणूक लढविणाऱ्या डॉक्टर अमोल कोल्हे यांनी कॉंग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढवत शिवसेनेच्या अथलराव शिवाजी दत्तात्रेय यांचा पराभव करीत लोकसभेचे सदस्यत्व मिळविले आहे. अमोल वैद्यकीय तज्ञ असले, तरी व्यवसायाने अभिनेते आहेत. बंगाली अभिनेत्री नुसरत जहान यांनी ही बशीरहाट येथून निवडणूक लढवत मोठा विजय मिळविला आहे. त्यांनी भाजपाच्या सायंतन बासू यांचा पराभव केला होता.

दक्षिण बेंगळूरू मधून निवडून आलेले अठ्ठावीस वर्षीय तेजस्वी सूर्या भाजपाच्या सर्वात तरुण नेतेमंडळींपैकी एक आहेत. सूर्या व्यवसायाने वकील असून, भाजपा युवा मोर्चाचे महासचिवही आहेत. त्यांनी कॉंग्रेसच्या बीके हरिप्रसाद यांचा पराभव करीत संसदेचे सभासदत्व मिळविले आहे. भारतीय क्रिकेट टीमचे स्टार ओपनिंग फलंदाज गौतम गंभीरने भाजपाकडून पूर्व दिल्लीच्या जागेसाठी निवडणूक लढवत कॉंग्रेसच्या अरविंद सिंह लवली आणि ‘आप’च्या आतिशी यांचा पराभव करीत संसदेमध्ये खासदार पद मिळविले आहे. लोकसभेसाठी प्रथमच निवडणूक लढवत जेतेपद प्राप्त करणाऱ्या ओडिशाच्या चंद्राणी मुर्मू व्यवसायाने इंजिनियर आहेत, तर भोजपुरी आणि बॉलीवूड मधील सुप्रसिद्ध अभिनेते रवी किशन यांनी भाजपाकडून निवडणूक लढवत संसदेमध्ये स्थान मिळविले आहे. अभिनेते सनी देओल यांनीही प्रथमच निवडणूक लढवत गुरदासपुर येथून बहुमताने विजयी होत संसदेत प्रवेश मिळविला आहे, तर प्रसिद्ध सुफी गायक हंसराज हंस यांनीही भाजपा कडून पश्चिम दिल्लीतील जागेसाठी निवडणूक लढवत प्रथमच बहुमत मिळविले आहे.

Leave a Comment