असा झाला होता राणी एलिझाबेथवर प्राणघातक हल्ला !


ब्रिटनचा समस्त राजपरिवार जूनच्या महिन्यामध्ये राणी एलिझाबेथच्या औपचारिक जन्मदिनानिमित्त दर वर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या ‘ट्रूपिंग द कलर्स’ समारंभाच्या तयारीमध्ये व्यस्त आहे. राणी एलिझाबेथचा जन्मदिवस वास्तविक एप्रिल महिन्यामध्ये असला, तरी जन्मदिवस सार्वजनिक रित्या साजरा करण्याच्या दृष्टीने जून महिन्याचे हवामान उत्तम असल्याने राणी एलिझाबेथचा औपचारिक जन्मदिवस दरवर्षी जूनमध्ये साजरा केला जातो. या निमित्ताने मोठ्या सोहळ्याचे आयोजन केले जात असून, ब्रिटीश सैनिकांच्या संचलानाचा कार्यक्रम यावेळी आयोजित केला जातो. यालाच ‘ट्रूपिंग द कलर्स’ म्हणतात. हजारो ब्रिटीश नागरिक, राजपरिवार आणि खुद्द राणीच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडत असतो. या सोहळ्याला उपस्थित असणारे हजारो नागरिक कधीही न विसरता येणाऱ्या या भव्य सोहळ्याच्या आठवणी घेऊन परतत असतात. असा हा भव्य दिव्य अविस्मरणीय सोहळा दर वर्षी पार पडत असला, तरी १९८१ सालचा ‘ट्रूपिंग द कलर्स’चा सोहळा केवळ तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांच्याच नाही, तर राजपरिवाराच्या स्मरणातही कायमचा कोरला गेला आहे.

आताच्या काळामध्ये या सोहळ्यासाठी राणी एलिझाबेथ लंडनयेथील बकिंगहॅम पॅलेस पासून शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये असलेल्या ‘द मॅल’ पर्यंत घोड्यांच्या बग्गीमधून प्रवास करीत असली, तरी तरुणपणी राणी एलिझाबेथ सैनिकी वेशामध्ये स्वतः अश्वारूढ होऊन, रस्त्याने जाताना जनतेचे अभिवादन स्वीकारीत या सोहळ्यात सहभागी होत असे. १९८१ साली, तेरा जून रोजी पंचावन्न वर्षांची राणी एलिझाबेथ आपल्या १९ वर्षांच्या ‘बर्मीझ’ घोड्यावर स्वार होऊन ‘ट्रूपिंग द कलर्स’ सोहळ्यामध्ये सहभागी होण्यास निघाली असता, सतरा वर्षीय मार्कस सार्जंट नामक एका तरुणाने अचानक राणीच्या दिशेने सहा गोळ्या ( blank shots )झाडल्या. गोळ्यांच्या धडाक्याने राणीचा घोडा बिथरला, पण राणी एलिझाबेथ उत्तम घोडेस्वार असल्याने तिने त्वरित आपल्या घोड्यावर नियंत्रण मिळविले. सुदैवाने राणीला, किंवा तिथे उपस्थित असलेल्या कोणालाही कसलीही इजा झाली नाही, पण राणी एलिझाबेथला नुकसान पोहोचविणे किती सहज शक्य आहे ही बाब मात्र पुन्हा एकदा स्पष्ट झाली.

राणीच्या दिशेने गोळ्या झाडणाऱ्या मार्कसला राणीच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्वरित ताब्यात घेतले, तेव्हा आपल्याला केवळ प्रसिद्धी हवी असल्याने आपण हे कृत्य केले असल्याचे मार्कसने म्हटले होते. पण मार्कसचा हेतू केवळ प्रसिद्धी मिळविणे नसल्याचे लवकरच सिद्ध झाले. किंबहुना ”ट्रूपिंग द कलर्स’ सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी राणी एलिझाबेथने बकिंगहॅम पॅलेसच्या बाहेर पडू नये, कारण बाहेर प्रचंड गर्दी करून उभ्या असलेल्या नागरिकांमध्ये राणीची हत्या करण्याच्या इराद्याने कोणी तरी उभे असणार असल्याचे’ धमकीवजा पत्र मार्कस ने बकिंगहॅम पॅलेसमध्ये, सोहळ्याच्या काही दिवस आधी पाठविले होते !

अमेरिकन राष्ट्रपती रोनाल्ड रेगन आणि पोप जॉन पॉल दुसरे यांच्या हत्येच्या प्रयत्नांच्या घटनांपासून प्रेरणा घेत राणी एलिझाबेथच्या हत्येचा घाट घालण्याची कल्पना आपल्याला सुचली असल्याचे मार्कसने पोलीस चौकशीच्या दरम्यान म्हटले होते. हे हत्याकांड घडवून आणवून जगातील सर्वात प्रसिद्ध किशोरवयीन होण्याची आपली इच्छा असल्याचेही त्याने सांगितले होते. मार्कसच्या कबुलीजबाबानंतर त्याचा गुन्हा सिद्ध झाल्याने त्याला ब्रिटीश न्यायालयाने पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनाविली होती. या कारावासाच्या काळा दरम्यान मार्कसचे मानसिक संतुलन ठीक नसल्याचे निदर्शनास आल्याने या पाच वर्षांपैकी बहुतेक काळ त्याला मानसोपचारतज्ञांच्या देखरेखीखाली मनोरुग्णालयामध्ये काढावा लागला. १९८४ साली मार्कसची सुटका झाल्यानंतर त्याने आपल्या आयुष्याला पुन्हा नव्याने सुरुवात केली.

Leave a Comment