‘शायरी’च्या माध्यमातून पंकजा मुंडेंनी उडवली विरोधकांची खिल्ली


बीड – परळी तालुक्यातील गोपीनाथ गडावर सोमवारी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रम झाले. पंकजा मुंडे यांनी याप्रसंगी उपस्थित जनसागराला संबोधित करताना खेल ताज का हो या जिंदगी का, अपना एक्का तभी दिखाना, जब सामनेवाले के पास बादशाह हो, एक्का दाखवायची मला कधी गरज पडली नाही. कारण माझ्यासमोर बादशाह कधी आलाच नाही, दुर्री तिर्रीवरच खेळण्यात आयुष्य गेले. असा टोला धनंजय मुंडे यांचे नाव न घेता लगावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही यावेळी उपस्थित होते.

मला लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी शिकविलेल्या राजकीय खेळ्या मी अजुन विरोधकांच्या विरोधात वापरल्याच नाही, कारण मला अद्याप पर्यंत सक्षम विरोधकच मिळाला नाही, असा टोलाही पंकजा मुंडे यांनी विरोधकांना लगावला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, हरिभाऊ बागडे यांच्यासह मराठवाड्यातील खासदार आणि आमदारांची यावेळी उपस्थिती होती.

विरोधकांकडून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या अपप्रचाराबाबत बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, की विरोधकांनी जातीय वाद निर्माण करून गटागटात भांडण लावण्याचे काम केले. खरे तर मला दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी शिकलेल्या अनेक खेळ्या मी अजून विरोधकांच्या विरोधात वापरलेल्याच नाहीत. मला त्या केव्हा वापरायच्या हे ठाऊक आहे. कारण मला दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी सांगितले आहे की, सक्षम विरोधक जोपर्यंत तुझ्यासमोर असणार नाही तोपर्यंत राजकीय खेळ्या वापरायच्या नाहीत. मला अजून पर्यंत तरी सक्षम विरोधक भेटला नसल्याचे म्हणत विरोधकांची पंकजा मुंडे यांनी खिल्ली उडवली.

Leave a Comment