इंग्लंडच्या नावावर जमा झाला ‘हा’ लाजिरवाणा विक्रम


लंडन : पाकिस्तान संघाला पहिल्याच सामन्यात वेस्ट इंडिजकडून लाजीरवाणा पराभव स्विकारावा लागल्यानंतर पाकिस्तानाने विश्वचषक स्पर्धेत सोमवारी कमाल केली. यजमान इंग्लंडला बेभरवशी पाकिस्तान संघाने पराभूत करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. इंग्लंडने या सामन्यात सर्वाधिक 6 वेळा 300+ धावा करण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या विक्रमाशी बरोबरी केली, पण एक लाजिरवाणा विक्रमही त्याचवेळी नावावर जमा झाला आहे. इंग्लंडला या सामन्यात 14 धावांनी पराभव पत्करावा लागला.

दमदार कामगिरी करताना पाकिस्तानच्या फलंदाजांनी संघाला 348 धावांचा पल्ला गाठून दिला. मोहम्मद हफिज ( 84), बाबर आजम ( 63), सर्फराज अहमद ( 55), इमाम उल हक ( 44) आणि फखर जमान ( 36) यांनी दमदार खेळ केला. त्याच्या प्रत्युत्तरात जो रूट व जॉस बटलर यांनी शतकी खेळी केल्या. कर्णधार इयॉन मॉर्गन, बेन स्टोक्स आणि जेसन रॉय यांना अपयश आले. इंग्लंडला रूट व बटलर यांच्या शतकानंतरही 9 बाद 334 धावांपर्यंतच मजल मारता आली. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात दोन फलंदाजांनी एकाच डावात शतक झळकावूनही पराभूत होणारा इंग्लंड हा पहिलाच संघ ठरला. इंग्लंडने सलग सहाव्यांदा 300+ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाच्या विक्रमाशी बरोबरी केली. हा पराक्रम ऑस्ट्रेलियाने 2007 मध्ये केला होता.

दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने तीनशे धावांचा पल्ला गाठला. पाकिस्तानने हा पल्ला गाठताना एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. पाकिस्तानने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ३४९ धावा केल्या. पण पाकिस्तानच्या एकाही फलंदाजाला या सामन्यात शतक झळकावता आले नाही. पाकिस्तानने एकाही खेळाडूने शतक न झळकावता सर्वोच धावसंख्या रचण्याचा विक्रम विश्वचषकात प्रस्थापित केला आहे. कारण विश्वचषकात एकही शतक न झळकावता झालेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या नावावर होता.

Leave a Comment