अखेर ‘महागठबंना’च्या ठिकऱ्या…!


लोकसभा निवडणुकीत प्रचंड पराभवाला सामोरे जावे लागलेल्या बहुजन समाज पक्ष (बसप) आणि समाजवादी पक्षा (सप) यांच्या ‘महागठबंधन’चे अवतारकार्य संपले आहे. बसप अध्यक्ष मायावती यांनी लागोपाठ सोमवारी आणि मंगळवारी केलेल्या घोषणेतून या फुटीचे संकेत मिळाले आहेत. सप आणि राष्ट्रीय लोक दलाशी (रालोद) आपली असलेली महायुती संपल्याचे मायावती यांनी जाहीर केले आहे. मायावती यांच्या बेभरवशी स्वभावाला अनुसरूनच ही घडामोड आहे. त्यामुळे मोठा गाजावाजा करून झालेल्या या महागठबंधनाच्या ठिकऱ्या उडविण्यासाठी मायावती यांनी ठिणगीच पुरवली, असे म्हणता येईल.

उत्तर प्रदेशात भाजपचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी ही युती अस्तित्वात आली होती आणि या युतीमुळे भाजपचा निवडणुकीतील प्रवास खडतर होईल, असा अंदाज होता. मायावती या उत्तर प्रदेशच्या 2007 ते 2012 पर्यंत मुख्यमंत्री होत्या आणि त्यानंतरची पाच वर्षे अखिलेश यादव मुख्यमंत्री होते. त्यामुळे आत्या-भाच्याची जोडी मोठे यश मिळवेल, अशी त्यांनाही व राजकीय निरीक्षकांनाही आशा होता. पण तसे झाले नाही. महायुतीला लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही.

राज्यात बसपची कामगिरी निराशाजनक झाल्यानंतर मायावती यांनी निवडणूक निकालाची समीक्षा करण्यासाठी नवी दिल्लीत पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक बोलावली होती. या महायुतीचा आपल्याला काहीही फायदा झाला नाही. या युतीतील सहकारी पक्षांची मते एकमेकांना मिळाली नाहीत, असा निष्कर्ष मायावती यांनी काढला. त्यामुळे पुढील विधानसभा निवडणुका कोणत्याही युती किंवा आघाडीच्या भरवशावर नव्हे तर स्वबळावर लढण्याची तयारी कार्यकर्त्यांनी ठेवावी, असे त्यांनी सांगितले. मंगळवारी त्यांनी युती तुटल्याचे अधिकृतरीत्या जाहीर केले. अखिलेश यादव यांनी पक्षात सुधारणा केली, तर पुन्हा युती करू असे त्या म्हणाल्या.

सपचे नेते अखिलेश यादव हे मतांचे विभाजन रोखण्यात अपयशी ठरले, असा ठपका मायावतींनी ठेवला. इतकेच नव्हे तर अखिलेश यांचे काका शिवपाल यादव यांनी यादवांची मते भाजपकडे वळवली आणि महायुतीचे नुकसान केले, असा आरोपही त्यांनी केला.

या महायुतीच्या झेंड्याखाली लोकसभा निवडणुकीत बसप आणि सपने क्रमश: 38 आणि 37 जागांवर उमेदवार उभे केले होते, तर तीन जागा रालोदसाठी सोडण्यात आल्या होत्या. तसेच रायबरेली आणि अमेठी या दोन मतदारसंघांत महायुतीने आपले उमेदवार उभे केले नव्हते. प्रत्यक्ष निकालात बसपला 10 आणि सपला केवळ 5 जागी यश मिळाले. अखिलेश यांची पत्नी डिम्पल यादव यांचा कन्नौज येथून पराभव झाला, तर चुलत भाऊ अक्षय व धर्मेंद्र यादव यांचासुद्धा अनुक्रमे फिरोजाबाद आणि बदायूं येथून पराभव झाला. हे दोन्ही मतदारसंघ यादवांचा बालेकिल्ली मानले जातात.

उत्तर प्रदेशात नजिकच्या काळात 11 मतदारसंघांत पोटनिवडणुका होणार आहेत. या पोटनिवडणुका बसप एकट्याने लढेल, असे संकेत मायावती यांच्या या वक्तव्यातून मिळाले आहेत. त्यांच्या या घोषणेने अनेकांना बुचकळ्यात टाकले आहे कारण बसपने आतापर्यंत कधीही पोटनिवडणुकीत उमेदवार दिलेले नाहीत. अगदी गेल्या वर्षी ज्या पोटनिवडणुकीमुळे हे दोन प्रमुख पक्ष एकत्र आले त्या निवडणुकीतही बसपने सपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता.

फुलपूर व गोरखपूर येथे झालेल्या त्या पोटनिवडणुकीत बसपने दिलेल्या पाठिंब्याच्या जोरावर सपचे उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे हे दोन सेक्युलर पक्ष एकत्र आले तर भाजपचा पराभव करता येऊ शकतो, असे समीकरण मांडण्यात आले. विरोधक एकत्र आल्यास मोदीलाटेचा पराभव होतो, याची देशव्यापी चर्चा सुरू झाली होती. म्हणून या युतीसाठी अखिलेश यादव यांनी जानेवारीत पुढाकार घेतला होता आणि ही युती 2022 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपर्यंत चालेल, असे यादव यांनी वारंवार सांगितले होते. वास्तविक मुलायमसिंह यादव हे बसपशी युती करण्याच्या विरोधात होते आणि अखिलेश यांनी आपल्या पित्याचा सल्ला धुडकावून मायावतींशी हातमिळवणी केली होती. इतकेच नव्हे तर मायावतींशी गट्टी जमविण्यासाठी त्यांनी विधानसभा निवडणुकीत सहकारी पक्ष असलेल्या काँग्रेसलाही सोडचिठ्ठी दिली होती. म्हणूनच निवडणूक निकालानंतर मायावतींशी युतीच पराभवासाठी जबाबदार असल्याचे सांगून मुलायमसिंह यांनी त्याचे उट्टे काढले होते.

युती तुटण्याची अधिकृत घोषणा मायावतींनी केली नसली तरी या युतीत सर्व काही आलबेल नसल्याचे पुरते स्पष्ट झाले आहे. त्यामुळे एकमेकांचे हाडवैरी असलेल्या या दोन पक्षांची गाठ घट्ट बांधली गेली नसल्याचेच स्पष्ट झाले आहे.

Leave a Comment