निपाह व्हायरस- अशी आहेत लक्षणे आणि बचावासाठी उपाय


भारतातील केरळ राज्यामध्ये पुनश्च निपाह व्हायरसचे रुग्ण आढळले असून, कोच्ची शहरामधील एका रुग्णाला या व्हायरसची लागण झाल्याचे निदान करण्यात आले आहे. अलीकडेच झालेल्या एका बैठकीमध्ये केरळच्या स्वास्थ्य मंत्र्यांनी या बाबीचा खुलासा केला आहे. राज्यामध्ये निपाह व्हायरसचा रुग्ण आढळल्यानंतर हा आजार फैलावू नये यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. गेल्या वर्षी केरळ राज्यातील कोहीकोड आणि मलप्पुरम या ठिकाणी निपाह व्हायरसची लागण झाल्याने सोळा रुग्ण मृत्युमुखी पडले होते. २००१ आणि २००७ साली पश्चिम बंगालमधील सिलीगुडीमध्ये ही या आजाराने ग्रस्त रुग्ण आढळले होते. या रोगाने संक्रमित व्यक्तींच्या संपर्कात आल्यास या रोगाची लागण इतरांनाही होऊ शकते. त्यामुळे या विकाराची लक्षणे कोणती आणि या रोगापासून बचाव करण्यासाठी काय उपाय करता येतील हे जाणून घेणे अगत्याचे आहे.

या रोगाने ग्रस्त रुग्णाला सतत ताप येणे, डोके दुखणे, अंगदुखी, उलट्या, अंगावर हलकी सूज, आणि रोग गंभीर असल्यास मानसिक भ्रम, किंवा फिट्स येणे अशी लक्षणे रुग्णांमध्ये दिसून येतात. योग्य उपचार न झाल्यास संक्रमित व्यक्ती अठ्ठेचाळीस तासांत कोमामध्येही जाऊ शकते. या रोगामुळे उद्भविणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण नऊ ते पंच्याहत्तर टक्के इतके आहे. या व्हायरसच्या संक्रमाणासाठी काही निश्चित प्रभावी औषधोपचार अद्याप उपलब्ध नाहीत. या रोगावर केले जाणारे उपचार मुख्यत्वे संक्रमण रोखण्याच्या उद्देशाने केले जात असतात. या रोगाची लागण एका रुग्णापासून दुसऱ्या निरोगी व्यक्तीला होत असल्याने या रोगाचे संक्रमण नियंत्रित ठेवणे अतिशय महत्वाचे ठरते. या रोगाचे निश्चित निदान करण्यासाठी विविध चाचण्या उपलब्ध आहेत.

निपाह व्हायरस हा मुख्यत्वे ‘फ्रुट बॅट्स’, किंवा अन्य प्रजातीच्या मायक्रोबॅट्स, म्हणजेच वटवाघुळे किंवा डुकरांपासून उद्भवतो. या व्हायरसने संक्रमित अन्नपदार्थांचे सेवन केल्यानेही हा रोग होऊ शकतो. त्यामुळे आपण खात असलेले अन्न नेहमी झाकून ठेवावे. अन्न नेहमी ताजे शिजविले जावे आणि उघड्यावर, झाडाखाली ठेवलेले नसावे. अनेकदा वटवाघुळे झाडांवर लागलेली फळे कुरतडतात. अशा फळांचे सेवन केले जाऊ नये. या रोगाने ग्रस्त रुग्णाच्या संपर्कात येताना काळजी घेणे आवश्यक आहे. रुग्णाशी संपर्क आलाच, तर आपले हात स्वच्छ धुवावेत. रुग्ण वापरत असलेले कपडे, भांडी, कंगवे, बादली, आणि इतर वस्तू वेगळ्या ठेवाव्यात व त्या इतर वस्तूंमध्ये मिसळू देऊ नयेत. या वस्तूंची साफसफाईही वेगळी केली जावी. झाडांवरून खाली पडलेली फळे खाऊ नयेत. ताडीचे सेवन केले जाऊ नये. जर एखाद्या रुग्णाचा या रोगाने मृत्यू झालाच, तर या रुग्णाच्या शरीराला स्पर्श करणे टाळले जावे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment