रणवीरने खरेदी केली सचिन, अक्रम आणि रिचर्ड्सच्या स्वाक्षऱ्या असलेली बॅट


‘गली बॉय’च्या भरघोस यशानंतर अभिनेता रणवीर सिंह सध्या ’83’ चित्रपटाच्या चित्रिकरणामध्ये व्यस्त आहे. सुप्रसिद्ध क्रिकेटपटू कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने १९८३ साली मिळविलेल्या जगज्जेतेपदाच्या घटनेवर या चित्रपटाचे कथानक आधारित आहे. या चित्रपटामध्ये रणवीर, कपिल देव यांची भूमिका साकारत असून, सध्या कपिलचे व्यक्तिमत्व आणि क्रिकेटच्या खेळातील बारकावे समजून घेण्यासाठी रणवीर सातत्याने कपिल देव यांच्याशी भेटी गाठी करीत आहे. अलीकडेच आयोजित एका कार्यक्रमामध्ये रणवीरने समस्त ’83’ च्या टीमसह हजेरी लावली होती. जागतिक पातळीवरील काही प्रख्यात क्रिकेटपटू देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. यांमध्ये सचिन तेंडुलकर, सर व्हिव्हियन रिचर्ड्स, आणि वसिम अक्रम सारख्या खेळाडूंचा समावेश होता. रणवीरने या सर्व क्रिकेटपटूंची भेट घेत त्यांच्या बरोबर अनेक छायाचित्रे ही घेतली.

याच कार्यक्रमामध्ये रणवीरने सचिन, व्हिव्हियन रिचर्ड्स आणि वसिम अक्रम यांच्या स्वाक्षऱ्या असलेली क्रिकेट बॅटही खरेदी केली. या बॅटकरिता रणवीरने तब्बल दोन हजार पौंड मोजले असून, भारतीय चलनामध्ये ही किंमत सुमारे १.७५ लाख रुपये इतकी आहे. या कार्यक्रमामध्ये तीन मातब्बर क्रिकेटपटूंच्या स्वाक्षऱ्या असलेल्या या बॅटचा लिलाव केला गेला असता, रणवीरने सर्वाधिक, म्हणजे दोन हजार पौंडची बोली लावून ही बॅट खरेदी केली.

रणवीर सध्या ’83’च्या चित्रीकरणासाठी क्रिकेटचे धडेही घेत असल्याचे समजते. कबीर खान या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून, रणवीरच्या सोबत साकिब सलीम, चिराग पाटील, पंकज त्रिपाठी, साहील खट्टर इत्यादी कलाकार या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

Leave a Comment