मध्य प्रदेशातील बुंदेल सम्राटांची राजधानी – ओरछा


मध्य प्रदेशातील टीकमगढ जिल्ह्यामध्ये स्थित ओरछा, प्राचीन बुंदेलखंडी वास्तुकलेचा सुंदर नमुना म्हणता येईल. एके काळी अतिशय बलाढ्य समजल्या जाणाऱ्या बुंदेल वंशाच्या सम्राटांची ही राजधानी. या ठिकाणी वाहणाऱ्या बेतवा नदीच्या किनारी अतिशय आकर्षक वास्तुकलेचे उदाहरण देणारी अनेक भव्य मंदिरे, महाल आणि किल्ले आहेत. शहराच्या घाई-गर्दीपासून, गोंगाटापासून दूर असलेले हे ठिकाण आता पर्यटनस्थळ म्हणून लोकप्रिय होत आहे. ओरछा या ठिकाणी रामाचे भव्य मंदिर असून, येथे रामाची देव म्हणून नाही, तर राजा म्हणून पूजा केली जाते. ओरछाची राणी श्रीरामाची भक्त होती. तिची भक्ती पाहून तिथल्या राजाने रामाचे मंदिर बनविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी रामाची मूर्ती खास अयोध्येहून घडवून आणण्यात आली, आणि मंदिराची निर्मिती पूर्ण होईपर्यंत या मूर्तीची स्थापना राजाच्या राजवाड्यातच करण्यात आली.

मंदिराचे निर्माणकार्य पूर्ण झाल्यानंतर जेव्हा रामाची मूर्ती राजवाड्यातून हलवून मंदिरामध्ये स्थापन करण्याची वेळ आली, तेव्हा रामाची मूर्ती राजवाड्यातील जागेवरून काही केल्या हलेनाशी झाली. राजाने ही मूर्ती हलविण्याचे अनेक प्रयत्न केले. अनेक सैनिकांनी मिळून ही मूर्ती हलविण्याचा प्रयत्न केला, तरी ही मूर्ती जागची हलली नाही. अखेर हीच रामचंद्रांची इच्छा असे समजून राजाने ही मूर्ती राजवाड्यातच राहू दिली आणि आपल्या महालाचे रूपांतर मंदिरामध्ये करविले. ही मूर्ती राजवाड्यामध्ये विराजमान असल्याने येथे रामाची पूजा देव म्हणून नाही, तर राजा म्हणून केली जाण्याची परंपरा तेव्हापासून अस्तित्वात आल्याचे म्हटले जाते.

ओरछा येथे उभा असलेला भव्य किल्ला, येथील बुंदेल वंशाच्या राजांच्या पराक्रमाचे, शौर्याचे प्रतीक आहे. याच किल्ल्यामध्ये राजा छत्रसाल आणि त्यांची कन्या मस्तानीचे वास्तव्य होते. आता या किल्यााचमध्ये पर्यटकांसाठी ‘लाईट अँड साऊंड’शो चे आयोजन केले जात असून, त्याद्वारे बुंदेल राजांच्या शौर्याची गाथा या वेळी कथन केली जात असते. येथे उभा असलेला जहांगीर महाल, बुंदेलखंडी वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणावा लागेल. या महालातील सुंदर नक्षीकाम असलेले झरोके, हवेशीर दालने, भिंतीवरील आकर्षक भित्तीचित्रे, अनेक उत्तम शिल्पे यावरून तत्कालीन कारीगारांचे कौशल्य आपल्या लक्षात येते.

ओरछा हे ठिकाण मध्य प्रदेशातील ग्वालियर शहरापासून १२० किलोमीटर अंतरावर असून, उत्तर प्रदेशातील झांसी शहरापासून सोळा किलोमीटर अंतरावर आहे. झांसी-खजुराहो मार्गावर ओरछा गाव असून, येथे येण्यासाठी झांसीहून नियमित बससेवा उपलब्ध आहे. तसेच दिल्ली, ग्वालियर, आणि वाराणसी पासूनही ओरछा पर्यंत येण्यासाठी बससेवा उपलब्ध आहे. येथील सर्वात नजीकचा विमानतळ खजुराहो येथे असून, दिल्लीसह देशातील अनेक विमानतळांवरून येथे येण्यासाठी विमानसेवा उपलब्ध आहे.

Leave a Comment