किरण बेदी होऊ शकतात जम्मू-काश्मीरच्या राज्यपाल


नवी दिल्ली: लवकरच जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी मोदी सरकारकडून किरण बेदी यांची नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे. रविवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची किरण बेदी यांनी भेट घेतली होती. सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल यावेळी मोदींचे अभिनंदन करण्यासाठी, आपण ही सदिच्छा भेट दिल्याचे बेदी यांच्याकडून सांगण्यात आले होते. पण, या भेटीमागील खरे कारण आता समोर आले आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारकडून किरण बेदी यांची सत्यपाल मलिक यांच्याजागी जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती होऊ शकते. भाजप आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) यांचे सरकार बरखास्त झाल्यानंतर काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर काश्मीरमधील राजकीय आणि सामाजिक वातावरणात सातत्याने तणाव आहे. मोदी सरकारकडून या पार्श्वभूमीवर किरण बेदी यांची राज्यपालपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

पीडीपीचा पाठिंबा भाजपने काढून घेतल्यानंतर मेहबुबा मुफ्ती यांचे सरकार कोसळल्यानंतर काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या पाठिंब्यावर पीडीपीने पुन्हा एकदा सत्तास्थापनेसाठी प्रयत्न केले होते. त्याचवेळी अवघे दोन आमदार असलेल्या सज्जाद लोन यांच्या पीपल्स कॉन्फरन्सनेही भाजप आणि इतर १८ आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगत सरकार स्थापनेचा दावा केला होता. पण घोडबाजाराला या सगळ्यामुळे ऊत येतील, असे सांगत जम्मू-काश्मीरची विधानसभा राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी बरखास्त केली होती.

सध्या किरण बेदी या पद्दुचेरीच्या नायब राज्यपाल आहेत. त्यांचा हा कार्यकाळ अनेक वादांमुळे गाजला आहे. किरण बेदी आणि पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांच्यात काही दिवसांपूर्वी हेल्मेटसक्तीच्या निर्णयावरून वाद रंगला होता. त्यावेळी मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांनी किरण बेदी यांच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलनही केले होते.

Leave a Comment