बांगलादेशच्या ‘या’ खेळाडूचा विश्वचषक स्पर्धेमध्ये अनोखा विक्रम


लंडन – रविवारी झालेल्या सामन्यात बांगलादेशने जायंट किलर बनत दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 21 धावांनी पराभूत केले. विजयासाठी यावेळी बांगलादेशने ठेवलेल्या 331 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाची तारांबळ उडाली. हाशिम अमलाच्या अनुपस्थितीत सलामीला आलेल्या एडन मार्कराम आणि क्विंटन डी’कॉक यांनी चांगला खेळ केला. पण, दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांचा शाकिब अल हसनच्या भेदक माऱ्या पुढे टिकाव लागला नाही.

प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने सलामीवीर तमिम इक्बाल आणि सौम्या सरकार यांनी दमदार फलंदाजी केली. त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी अनुभवी शकिब अल हसन आणि मुशफीकर रहमान यांनी 142 धावांची विक्रमी भागीदारी केली. बांगलादेशची एकदिवसीय क्रिकेटमधील ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली आहे. पण या सामन्यात शकिब अल हसन याने सर्वांचे लक्ष वेधले. गोलंदाजी करताना त्याने एकदिवसीय क्रिकेटमधील आपला 250वा बळी घेतला. त्याचबरोबर सनथ जयसूर्या, शाहिद आफ्रिदी, जॅक कॅलिस आणि अब्दुल रझाक यांच्या पंक्तितही शाकिबने स्थान पटकावले. तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये 250 बळी आणि 5 हजार धावा करणारा पाचवा अष्टपैलू खेळाडू ठरला. 199 सामन्यात त्याने हा पराक्रम केला आणि ही अष्टपैलू खेळाडूची सर्वात जलद कामगिरी आहे. शिवाय तो बांगलादेशकडून 250 विकेट घेणारा दुसरा गोलंदाज आहे.

याआधी 2007 च्या विश्वचषक स्पर्धेमध्ये बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले होते. त्यांनी तेव्हा आफ्रिकेवर 67 धावांनी विजय मिळवला होता. आजच्या सामन्यात त्या संघातील चार खेळाडू होते. कर्णधार मोर्तझा, यष्टीरक्षक रहिम, तमिम इक्बाल आणि शाकिब अल हसन हे चौघे 2007 च्या विश्वचषक स्पर्धे संघात होते.

Leave a Comment