स्मार्टफोनची विक्री – जगात मंदी, भारतात तेजी!


अॅप्पल कंपनीने भारतात फोनचे उत्पादन आणि विक्री करण्यासाठी नवी योजना आखल्याची घोषणा नुकतीच केली आहे. भारतीय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले असे वाटण्याचा एक संभव आहे. मात्र वास्तव हे आहे, की स्मार्टफोनच्या विक्रीत घट होत आहे आणि भारतातील ग्राहकांक हेच कंपनीचे आशास्थान आहे आहे. अॅप्पलच कशाला, अन्य कंपन्यांच्या स्मार्टफोनच्या खरेदीतही ग्राहकांमध्ये फारसा रस दिसत नसल्यामुळे त्यांची विक्रीही मंदावली आहे.

जागतिक पातळीवर सतत सहाव्या त्रिमाहीत स्मार्टफोनच्या शिपमेंटमध्ये घट आढळली आहे. या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत स्मार्टफोन शिपमेंटमध्ये 5 टक्क्यांची घट झाली, असे काउन्ट पॉईंट रिसर्च या संस्थेने केलेल्या पाहणीत आढळले होते. सॅमसंग, अॅप्पल आणि अन्य अनेक महत्त्वाच्या ब्रँडमध्ये हा कल दिसून आला होता. फक्त हुआवाई, व्हिवो आणि ओप्पो यांसारख्या चिनी कंपन्यांच्या विक्रीत वाढ दिसून आली होती. मात्र जगातील सर्वात महत्त्वाची स्मार्टफोन बाजारपेठ मानल्या जाणाऱ्या अमेरिकेत हुआवाईची फारशी उपस्थिती नाही. अन् आता अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बंदी घातल्यामुळे हुआवाईला विस्तारालाही फारसा वाव नाही. स्मार्टफोनची बाजारपेठ परिपक्व झाली असून उद्योगातील स्पर्धेमुळे हा वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत आपल्या व्यवसायावर अधिक दबाव येण्याची अपेक्षा सॅमसंगने व्यक्त केली आहे.

या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत स्मार्टफोन शिपमेंट्स 2018च्या याच काळातील विक्रीपेक्षा 6.6%नी कमी झाल्याचे विश्लेषक फर्म आयडीसीने म्हटले आहे. आयडीसीने हा अहवाल जारी केला त्याच आठवड्यात गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी म्हटले आहे, की महागड्या आणि उंची फोनची विक्री करणे पूर्वीपेक्षा खूप कठीण झाले आहे. त्याच प्रमाणे स्मार्टफोन क्रांतीचा सुवर्णकाळ संपला आहे, असे मॅव्हेरिक कॅपिटल या प्रमुख निधी पुरवठादार कंपनीने 2018 मध्ये जाहीर केले होते.

एक काळ होता, की अॅप्पलचा फोन घेण्यासाठी ग्राहकांमध्ये चढाओढ असायची. मात्र आता लोकांमध्ये अॅप्पलची क्रेझ ओसरली असून एकूणच स्मार्टफोनची विक्री मंदावली आहे. याचे कारण म्हणजे जुन्या आणि नवीन उपकरणांमध्ये आता फार कमी फरक राहिला आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी अपग्रेड करण्यासाठी पैसे देण्यास ग्राहक नाखुश असल्याचे दिसते. सध्या जवळजवळ 80 टक्के अमेरिकन नागरिकांच्या हातात स्मार्टफोन आहेत आणि त्यामुळे नवीन ग्राहक शोधणे मोबाईल कंपन्यांना दिवसेंदिवस कठीण होणार आहे. या मंदीच्या विरोधात विविध कंपन्या वेगवेगळे उपाय करू पाहत आहेत. उदाहरणार्थ अॅप्पलने आपल्या सेवा व्यवसायावर जास्त लक्ष देणे सुरू केले आहे. अॅप्पल म्युझिक, आयक्लाउड आणि अॅप्पल पे या सेवा आयफोन वापरकर्त्यांनी वापराव्या, यासाठी ग्राहकांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. जेणेकरून प्रत्यक्ष मोबाईलच्या कमी विक्रीमुळे होणारे नुकसान भरून निघेल. सॅमसंग, हुआवाई आणि मोटोरोला यासारख्या कंपन्या विक्री वाढण्याच्या दृष्टीने नवीन तंत्रज्ञान व क्लृप्त्यांवर भर देत आहेत. उदाहरणार्थ, अतिवेगवान 5जी वायरलेस इंटरनेट आणि घडी करण्याजोगे पडदे (फोल्डेबल स्क्रीन ) इ.

भारतापुरते बोलायचे झाले, तर देशातील बाजारपेठेचा कल जगाच्या उलट आहे. आपल्याकडे पहिल्या तिमाहीत (जानेवारी ते मार्च) गेल्या वर्षीच्या तुलनेत स्मार्टफोनची विक्री 4 टक्क्यांनी वाढली. या तीन महिन्यात जवळपास 3.1 कोटी स्मार्टफोनची विक्री झाली. काऊंटरपॉईंट कंपनीच्या अहवालातच ही माहिती देण्यात आली होती. त्याचबरोबर भारतात डेटा वापर वाढला असून येथील लोक इतर देशाच्या तुलनेत आपला फोन कमी कालावधीत बदलत आहेत. या अहवालातील माहितीनुसार. भारतीय व्यक्ती दर 17 महिन्यांनी आपला स्मार्टफोन बदलतात. मेट्रो शहरांमधील व्यक्ती दर 16 महिन्यांनी नवीन फोनची खरेदी करते, तर इतर शहरांतील लोक दर 18 महिन्यांनी नवीन स्मार्टफोन खरेदी करतात.

आयडीसी कंपनीच्या अहवालानुसार, भारतातील स्मार्टफोनची विक्री चक्क 7.1 टक्क्यांनी वाढली आहे. भारतात लोकसंख्याही वाढत आहे आणि लोकांची खरेदी करण्याची क्षमताही वाढत आहे. फोनच्या खरेदीत झालेली वाढ ही त्याचेच द्योतक आहे. सरकारने गेल्या काही महिन्यांत ऑनलाईन पोर्टलद्वारे मोबाईलची स्वस्तात बंधने करण्यावर बंधने आणली होती, तरीही गेल्या वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत ऑनलाईन स्मार्टफोन विक्रीत 19.6 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

या सर्वाचा मथितार्थ स्पष्ट आहे. अन्य अनेक उत्पादनांप्रमाणे किंवा वस्तूंप्रमाणे स्मार्टफोनसाठीही भारत हाच आशेचा किरण आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक जागतिक कंपन्या येथे मैदानात उतरतील यात नवल नाही. वर उल्लेख केलेला अॅप्पलचा उपक्रम हा त्याचाच भाग होय.

Leave a Comment