काँग्रेस अजून संपलेली नाही!


कर्नाटकात एक महिन्याच्या आत मतदारांनी कल बदलला असून सत्ताधारी काँग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस) पारड्यात आपले दान टाकले आहे. त्यामुळे गलितगात्र झालेल्या काँग्रेसला नवसंजीवनी मिळाली नसती तरच नवल. मात्र यातूनच काँग्रेस अजून संपली नाही, हा संदेशही गेला आहे.

कर्नाटकात एका महिन्याच्या आत झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने आपला झेंडा फडकवला आहे. विशेष म्हणजे राज्यात काँग्रेस आणि जेडीएस युतीचे सरकार आहे, मात्र या स्थानिक निवडणुका त्यांनी एकेकट्याने लढवल्या होत्या. स्थानिक नेत्यांनी आपापल्या ठिकाणच्या स्थितीनुसार स्थानिक पातळीवर रणनीती ठरवावी, असे निर्देश राज्याच्या नेत्यांनी दिले होते.

स्थानिक स्वराज्य संस्थेतील 70 टक्के जागांवर पक्षाने कब्जा केला आहे. यामुळे काँग्रेसच्या बाहूंमध्ये शक्ती संचारणे स्वाभाविक होते. पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी या निवडणुकीचे निकाल टि्वटरवर शेअर केले. “कर्नाटकात 19 आणि 23 एप्रिल रोजी लोकसभेच्या निवडणुकांसाठी मतदान झाले होते. त्यानंतर एका महिन्याने 29 मे रोजी नागरी स्थानिक संस्थांच्या निवडणुका झाल्या. लोकसभा निवडणुकीत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अंतर्गत येणाऱ्या ईव्हीएमचा वापर करण्यात आला. या निवडणुकीत राज्य निवडणूक आयोगाच्या अंतर्गत येणाऱ्या ईव्हीएमचा वापर झाला,” असे त्यांनी लिहिले. “लोकांनी आपला विचार बदलून काँग्रेसला निवडले, यामुळे आम्ही आनंदीत आहोत,“ असे त्यांनी म्हटले आहे.

राज्यातील सात स्थानिक संस्थांसाठी झालेल्या या निवडणुकांचे निकाल शुक्रवारी जाहीर झाले. एकूण 1,221 प्रभागांपैकी काँग्रेसने 509 प्रभागांमध्ये विजय मिळविला आहे, तर जेडीएसने 174 आणि भाजपने 366 प्रभागांत विजय मिळवला. कॉंग्रेसने नगरपालिकांमध्ये 90 प्रभाग जिंकले, तर भाजप आणि जेडीएस यांनी अनुक्रमे 56 आणि 38 प्रभाग जिंकले.

काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे लोकसभा निवडणुकीत पानिपत झाले होते. कर्नाटक लोकसभेच्या एकूण 28 जागा असून 25 जागा भाजपला मिळाल्या होत्या, तर सत्ताधारी काँग्रेस-जेडीएस युतीला केवळ एका-एका जागेवर समाधान मानावे लागले होते. एक जागा अपक्षाला मिळाली होती. त्यामुळे राज्यातील शहरी स्थानिक संस्थांमध्ये मिळालेले हे यश पक्षाला हुरूप आणणारे आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळे निराश झालेल्या पक्षाला या निमित्ताने चांगली वार्ता मिळाली आहे.

या निकालांमुळे उत्साहित झालेले राज्य काँग्रेस अध्यक्ष दिनेश गुंडूराव यांनी आपला पक्ष तळागाळात मजबूत असल्याचा दावा केला. मात्र लोकसभा निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या मतदान यंत्राबद्दल त्यांनीही शंका उपस्थित केली आणि इतक्या कमी काळात जनादेशात एवढा फरक पडत असेल तर त्याची पडताळणी व्हायला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. “ते काहीही असले तरी लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे आणि लोकसभेच्या निकालानंतर आम्हाला आत्मविश्वास दिला आहे,” असेही ते म्हणाले.

ते अक्षरशः खरे आहे. काँग्रेस पक्ष हा एका विशिष्ट विचाराचा पक्ष आहे. काँग्रेस पक्षाला एक परंपरा आहे. सन 1952 पासून प्रत्येक निवडणुकीत काँग्रेस पक्षाला यश मिळाले. ताऊन-तुलाखून निघालेल्या या पक्षाने अनेक संकटांना पार केली. मात्र इंदिरा गांधीच्या मृत्यूनंतर काँग्रेसचा देशावरील एकछत्री अंमल कमी होत चालला आणि प्रादेशिक पक्षांची सद्दी वाढली. त्यानंतर 2014 मध्ये तर नरेंद्र मोदी नावाच्या वादळापुढे काँग्रेस पाल्यापाचोळ्यासारखी उडून गेली. ती वाताहात आता 2019 मध्येही थांबलेली नाही.

यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य येणे स्वाभाविक होते. गेल्या निवडणुकीत मोदी यांनी काँग्रेसमुक्त भारताची घोषणा दिली. ती यंदा खरी ठरते की काय, अशी भीती अनेक नेत्यांना व कार्यकर्त्यांना भेडसावू लागली आहे. म्हणूनच अनेक नेत्यांनी भाजपशी घरोबा करणे सुरू केले आहे. महाराष्ट्रात तर चक्क विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटीलच भाजपमध्ये दाखल होत आहेत.

या परिस्थितीत आजही तळागाळात पसरलेली संघटना म्हणून काँग्रेसचे महत्त्व आहे, हा संदेश या निमित्ताने गेला आहे. पक्षात योग्य नेतृत्व असेल तर काय होऊ शकते हे पंजाबात अमरिंदर सिंग आणि मणिपुरात इबोबी सिंग यांच्या विजयाने दाखवले आहे. या दोन्ही राज्यांत काँग्रेसचे खंबीर नेतृत्व आहे. निवडणुकांत त्यांना पक्षाने स्वातंत्र्य दिले आणि त्याचा योग्य तो परिणाम दिसून आला. तसेच मध्य प्रदेशात,राजस्थानात व छत्तीसगडमध्ये पक्षाचा विजय हे त्याचेच चिन्ह आहे. त्या पाठोपाठ आता कर्नाटकातील निकालांनी काँग्रेस अजून संपली नाही, हे दाखवले आहे. त्यातून भाजपने काही धडा घ्यावा का नाही, हा वेगळा प्रश्न आहे. पण किमान काँग्रेस नेत्यांनी उमेद धरली तरी पुष्कळ झाले!

Leave a Comment