ममतांना ‘जय श्री राम’चे 10 लाख पोस्टकार्ड पाठवणार भाजप


कोलकाता : दिवसेंदिवस पश्चिम बंगालमधील राजकीय तणाव वाढत चालला असून येथील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आणि भाजपमध्ये राजकीय द्वंद सुरुच आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी या काही दिवसांपूर्वी ‘जय श्री राम’च्या घोषणेवरुन चिडल्या होत्या. त्यानंतर भाजपने आता ममता बनर्जी यांना ‘जय श्री राम’ लिहिलेले 10 लाख पोस्टकार्ड पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

‘जय श्री राम’ लिहिलेले 10 लाख पोस्टकार्ड आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पाठवण्याचा निर्णय घेतला असल्याचे पश्चिम बंगालचे भाजप खासदार अर्जुन सिंह यांनी सांगितले. काही भाजप कार्यकर्त्यांनी गेल्या 30 मे रोजी ममता बॅनर्जींसमोर ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्या होत्या. ममता बॅनर्जी या त्यावेळी चिडल्या आणि त्या भाजप कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून गेल्या. तर दुसरीकडे काही भाजप कार्यकर्त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांसमोर ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्याने त्यांच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. या सर्व घटनांनंतर आता अर्जुन सिंह यांनी ममता बॅनर्जी यांना ‘जय श्री राम’ लिहिलेले 10 लाख पोस्टकार्ड पाठवण्याचा निर्णय घेतला.

Leave a Comment