मोदींचा मतदार जपणार स्मृती इराणी


सरलेल्या लोकसभा निवडणुकीत अवघ्या देशाचे लक्ष ज्या मतदारसंघाकडे लागले होते त्यातील प्रमुख म्हणजे उत्तर प्रदेशमधला अमेठी हा मतदारसंघ. नेहरू-गांधी घराण्याचा हा पारंपरिक मतदारसंघ होय. थेट संजय गांधी यांच्या काळापासून हा गांधी घराण्याचा हुकूमाचा मतदारसंघ म्हणून गणला जात होता. यंदाच्या निवडणुकीत मात्र काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना या मतदारसंघाने हात देण्याऐवजी हात दाखवला. त्यामुळे चौथ्यांदा मतदारांना सामोरे जात असलेल्या राहुल गांधी यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांच्या या पराभवाच्या मागे होत्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी.

माजी अभिनेत्री असलेल्या स्मृती इराणींनी 2014च्या निवडणुकीत राहुल गांधी यांना तुल्यबळ लढत दिली होती. मोदी लाट म्हणून गणल्या गेलेल्या त्या निवडणुकीत राहुल बालंबाल निवडून आले. त्यामुळे इराणी यांनी गेली पाच वर्षे या मतदारसंघावर मशागत केली होती आणि त्याच्या परिणामी राहुल यांना पराभूत व्हावे लागले. स्मृती इराणी यांची गणना जायंट किलरमध्ये होऊ लागली. साहजिकच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात त्यांना एखादे महत्त्वाचे मंत्रालय मिळेल, असा जाणकारांचा होरा होता.

प्रत्यक्षात शुक्रवारी जेव्हा निकाल जाहीर झाले तेव्हा इराणी यांच्या वाट्याला महिला व बालकल्याण हे खाते आल्यामुळे अनेकांची निराशा झाली. इराणी यांना कमी महत्त्वाचे खाते देण्यात आले, असा अनेकांचा सूर होता. वस्तुस्थिती वेगळीच आहे. मोदी यांनी इराणी यांच्याकडे एक महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

इराणी यांनी ज्या पद्धतीने अमेठीची जपणूक केली आणि मतदारांना आपल्याकडे वळवले ते राजकारणाच्या अभ्यासकांसाठी एक आदर्श ठरावे. केंद्रातील आपल्या मंत्रीपदाचा पूर्ण उपयोग करून त्यांनी या मतदारसंघात सतत संपर्क ठेवला. मतदारसंघातील महिलांना साड्या वाटल्या. वारंवार अमेठीत हजेरी लावून कार्यकर्त्यांशी थेट संपर्क ठेवला. ‘मी अमेठीची मुलगी आहे’ अशी भावनिक सादही इराणी यांनी घातली. त्याचे फळ त्यांना मिळाले. त्याचा त्यांना एवढा आनंद झाला, की इराणी यांनी 14 किलोमीटर अनवाणी चालत सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. जणू त्यांनी एखादा नवसच फेडला. त्यांची हीच चिकाटी, सातत्य आणि काहीही करून लक्ष्य साध्य करण्याच्या गुणाचाच आता मोदी वापर करून घेणार आहेत.

याचे कारण म्हणजे महिलांमध्ये असलेली मोदींची लोकप्रियता. कोणी कितीही नाकारले तरी मोदी यांनी महिलावर्गाला भुरळ घातली आहे. तसेच भाजपने 2019 च्या निवडणुकीत महिलावर्गावर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले होते. देशातील मतदारांमध्ये महिलांची संख्या निम्मी आहे. या सरकारच्या गेल्या पाच वर्षांतील विविध योजनांवर नजर टाकली तर यातील बहुतांश योजनांमध्ये कोठे ना कोठे महिला हा घटक केंद्रस्थानी दिसून येतो. मोदी सरकारच्या जनकल्याण योजनांच्या लाभार्थींमधील तब्बल 18 कोटी या महिला आहेत. खास महिलांसाठी सरकारने केलेल्या निर्णयांची यादी तर खूप मोठी आहे. त्यातच तोंडी तलाकच्या निर्णयामुळे मुस्लिम महिलांमध्ये भाजपने एक कोपरा निर्माण केला आहे, असा पक्षाचा दावा आहे.

त्यामुळेच यंदाच्या निवडणुकीत महिलांनी चढाओढ लावून केल्यासारखे मतदान केल्याचे निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरून दिसते. यंदाच्या निवडणुकीत विक्रमी 66.7 टक्के मतदान झाले आणि सुमारे 13 राज्ये व केंद्र शासित प्रदेशांमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक होती.ऐन उन्हाळ्यात असलेल्या मतदानाच्या सर्व टप्प्यांमध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणावर भाग घेतला. मतदानासाठी लांबच लांब रांगा लावलेल्या महिलांची छायाचित्रेही मोठ्या प्रमाणावर प्रसृत झाली. उज्जवला योजना, शौचालयांचे बांधकाम आणि पंतप्रधान ग्रामीण आवास योजना अशा कल्याणकारी योजनांचा लाभ महिलांना झाला आणि याच महिलांनी मोदींना मतदान केले, असे विश्लेषकांचे मत आहे.

आपल्या याच मतदारांना सांभाळण्याची जबाबदारी मोदींनी इराणी यांच्यावर सोपवली आहे. ज्या प्रमाणे इराणींनी पाच वर्षे अमेठीवर खास लक्ष देऊन तिथे कमळ फुलवले, त्याच धर्तीवर इराणींनी महिला वर्गावर लक्ष देऊन त्यांना भाजपशी बांधील बनवावे, ही अपेक्षा. ही अपेक्षा त्या कितपत पुरी करतात यावरून त्यांचे पुढील राजकीय भवितव्य ठरणार आहे.

Leave a Comment