चिमुकल्या सिक्कीमची मोठी कहाणी!


देशात लोकसभा निवडणुका पार पडल्या आणि नवे सरकारही स्थानापन्न झाले. या निवडणुकांसोबत तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही झाल्या. त्यात आंध्र प्रदेश आणि ओडिशा या राज्यांच्या राजकीय महत्त्वामुळे व भौगोलिक आकारामुळे त्यांची थोडी-फार चर्चा तरी झाली. मात्र देशाच्या एका टोकाला असलेल्या सिक्किम या चिमुकल्या राज्याकडे तर कोणी ढुंकूनही पाहिले नाही.

वास्तविक दिल्लीतील केंद्रीय निवडणुकांप्रमाणेच सिक्किममधील निवडणुकाही राजकीय भूकंप आणणाऱ्या होत्या. देशात सर्वाधिक काळ आणि यशस्वी मुख्यमंत्री असलेल्या पवनकुमार चामलिंग आणि त्यांचा सिक्किम डेमोक्रॅटिक फ्रंट (एसडीएफ) पक्षाला मतदारांनी सत्तेतून बेदखल केले.

खरे तर चामलिंग हे काही साधेसुधे मुख्यमंत्री नव्हते. त्यांनी समर्थपणे आपल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आणि अशा अनेक योजना सादर केल्या ज्यांचा कोणी विरोधही केला नाही. भारत सरकारने सिक्कीम हे पूर्णपणे ‘सेंद्रिय राज्य’ झाल्याचे 2016 मध्ये जाहीर केले होते. या यशामागे चामलिंग यांनी तेरा वर्षांपासून अथक प्रयत्न आणि त्यांची दूरदृष्टी कारणीभूत होते. आता सिक्कीममध्ये रासायनिक खत वापरले जात नाही. तसेच राज्यात प्लॅस्टिक वापरण्यावर पूर्ण बंदी आहे. या कामगिरीबद्दल संयुक्त राष्ट्रांच्या फूड अँड अॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशनचे ‘फ्युचर पॉलिसी गोल्ड अॅवॉर्ड’ देऊन चामलिंग यांना गौरवले होते. हे हरितक्षेत्रातले ‘ऑस्कर’ मानले जाते.

चामलिंग हे 1994 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले आणि त्यानंतर त्यांनी सतत सत्तेत परतण्याचा विक्रम रचला. लागोपाठ पाच विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी यश मिळविले होते. चामलिंग यांनी ज्योती बसू यांचा 23 वर्षांचा सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपद भूषविण्याचा विक्रम मोडला होता.मात्र प्रेमसिंह तमांग यांच्या रूपाने चामलिंग यांच्या राजकीय प्रतिस्पर्ध्याने 2013 मध्ये पदार्पण केले.

हे तमांग म्हणजे चामलिंग यांचे माजी सहकारीच. त्यांना पीएस गोले म्हणूनही ओळखले जाते. चामलिंग यांच्या एसडीएफचेही ते संस्थापक सदस्य होते. चामलिंग यांच्या 2014 सोजता सर्व सरकारमध्ये ते सामील होते. मात्र एसडीएफ पक्षात भ्रष्टाचार आणि घराणेशाही होत असल्याचा आरोप करत त्यांनी 2013 मध्ये सिक्किम क्रांतिकारी मोर्चा (एसकेएम) या पक्षाची स्थापना केली.

चामलिंग यांना 2009 मध्ये झालेल्या निवडणुकीत राज्यातील सर्व 32 विधानसभा मतदारसंघात विजय मिळाला होता, मात्र 2014 मध्ये एसकेएमने 10 जागा जिंकून त्यांना धक्का दिला होता. आपली सत्ता जाण्याचा अंदाज बहुदा त्यांना तेव्हाच आला असावा. त्यामुळे तमांग यांनी पक्ष स्थापन करताच राज्य सरकारच्या सतर्कता विभागाने सरकारी निधीचा दुरुपयोग केल्याबद्दल त्यांच्या चौकशीला सुरूवात केली. राज्य सरकारने एका योजनेंतर्गत लाभार्थ्यांना गाई देण्यासाठी तरतूद केलेल्या 9.5 लाख रुपयांचा अपहार करण्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. या खटल्याचे आरोपपत्र सादर झाल्यावर त्यांना दंड ठोठावून आणि तुरुंगाचा सामना करावा लागला. गंमत म्हणजे भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दोषी ठरल्यानंतरही त्यांना पुन्हा निवडणूक लढण्याची परवानगी देण्यात आली. यामागचे गूढ आजही कायम आहे.

इतकेच नाही तर2018 मध्ये ते तुरुंगातून बाहेर आल्यावर एखाद्या नायकाप्रमाणे त्यांचे स्वागत करण्यात आले. आता ताज्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला केवळ दोन जागांचे बहुमत लाभले आहे.

सिक्किमची ओळख ठरलेला प्रसिद्ध फुटबॉल खेळाडू बाईचुंग भूतिया यानेही ऐन निवडणुकीच्या आधी हमरो सिक्किम नावाचा पक्ष स्थापन केला होता. त्याने उचलेल्या मुद्द्यांमुळे भ्रष्टाचार, व्यसनाधीनता, मानसिक आजार अशा सिक्किमच्या अनेक काळ्या बाजू जगासमोर आल्या. सिक्किमची लोकसंख्या अवघी सहा लाखाची आहे. मात्र राज्यात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे. तसेच सिक्किममध्ये आत्महत्येचा दर आहे प्रति एक लाख 37.5 एवढा असून तो भारतात सर्वाधिक आहे. देशाच्या सरासरीपेक्षा हा सुमारे तीन पट अधिक आहे. सिक्किममध्ये 10 पैकी 7 किशोरवयीन मुले-मुली मादक पदार्थांचे सेवन करतात. महाराष्ट्रातील राज ठाकरे यांच्या प्रमाणेच भुतियाच्या हमरो सिक्किमने एकही जागा लढविली नाही, मात्र या पक्षाने अशा अनेक समस्या मांडल्या आणि त्यामुळे या पक्षाची चर्चाही झाली.सत्ताधारी सिक्कीम डेमॉक्रेटिक आणि सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा हे दोन्ही पक्ष म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या दोन्ही पक्षांना पर्याय म्हणून रिंगणात उतरल्याचा दावा भुतिया यांनी केला होता.

आता तमांग यांनी सत्ता हाती घेतली आहे. चामलिंग यांचा पर्यावरणपूरक वारसा जपत ते विकास कसा करतात, याची उत्सुकता लागणे साहजिक आहे.

Leave a Comment