विश्वचषक – ७ गडी राखून वेस्ट इंडिजची पाकिस्तानवर मात


नवी दिल्ली – वेस्ट इंडिजने पहिल्याच सामन्यात सलामीवीर ख्रिस गेलच्या धडाकेबाज अर्धशतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानवर ७ गडी राखून मात केली आहे. वेस्ट इंडिजाच्या फलंदाजांनी अवघ्या १४ षटकांमध्ये पाकिस्तानने विजयासाठी दिलेले १०६ धावांचे आव्हान पूर्ण केले. पाकच्या गोलंदाजांचा ख्रिस गेलने समाचार घेत ३४ चेंडूत ५० धावा केल्या. ६ चौकार आणि ३ षटकारांचा त्याच्या या खेळीत समावेश होता. ख्रिस गेलला निकोलस पूरनने चांगली साथ दिली. पाकिस्तानकडून मोहम्मद आमिरने ३ फलंदाजांना माघारी धाडले, मात्र कमी धावसंख्येमुळे वेस्ट इंडिजच्या फलंदाजांवर अंकुश लावण्याचं काम तो करु शकला नाही.

तत्पूर्वी यंदाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील पहिलाच सामना खेळत असलेला पाकिस्तानी संघ वेस्ट इंडिजच्या धारदार गोलंदाजीचा सामना करताना अवघ्या १०५ धावांमध्ये माघारी परतला. हा सामना जिंकण्यासाठी वेस्ट इंडिजसमोर १०६ धावांचे माफक आव्हान आहे. वेस्ट इंडिजकडून ओश्ने थॉमसने ४, कर्णधार जेसन होल्डरने ३, आंद्रे रसेलने २ आणि शेल्डन कोट्रेलने १ गडी बाद केला.

कर्णधार जेसन होल्डरचा नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. इमाम उल-हकला माघारी धाडत कोट्रेलने पाकिस्तानला पहिला धक्का दिला. यानंतर पाकिस्तानच्या डावाला गळतीच लागली. उसळत्या चेंडूचा मारा करत वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी पाक फलंदाजांच्या नाकीनऊ आणले. थोडाफार प्रतिकार करण्याचा प्रयत्न फखार झमान आणि बाबर आझमने केला, पण त्यांचे प्रयत्न तोकडे पडले.

पाकिस्तानची मधली फळी ओश्ने थॉमस, जेसन होल्डर आणि आंद्रे रसेल यांनी कापून काढत सामन्यावर आपले वर्चस्व गाजवले. पाकिस्तानचा संघ १०० धावांचा टप्पा ओलांडतो की नाही अशी परिस्थिती एका क्षणाला निर्माण झाली होती. पण वहाब रियाझने अखेरच्या फळीत फटकेबाजी करत संघाला १०० धावांचा टप्पा ओलांडून दिला.

Leave a Comment