व्हिडीओ व्हायरल; चालू कारमध्ये महिलेची प्रसुती


न्यूयॉर्क : चालू कारमध्ये एका महिलेने बाळाला जन्म दिल्याची घटना अमेरिकेतील निवाडामध्ये घडली आहे. तीन मुले आणि पतीसोबत रुडी नेपियर नावाची महिला रुग्णालयात जात होती. तिला रस्त्यातच प्रसूती वेदना सुरु झाल्यानंतर महिलेने चालू कारमध्येच बाळाला जन्म दिला. या दाम्पत्याकडून या घटनेचा व्हिडीओही शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओची चर्चा जगभरात आहे. पती माईक एंटनी हे प्रसूतीवेळी कार चालवत होते.

कारमध्ये पुढच्या सीटवर रुडी नेपियर या बसलेल्या होत्या. त्यांना रुग्णालयात जातानाच प्रसूती वेदना सुरु झाल्या. हा संपूर्ण व्हिडीओ मागच्या सीटवर असलेल्या रुडी यांच्या 10 वर्षांच्या मुलाने शूट केला आहे. हा व्हिडीओ काही वेळाने मोबाईलमध्ये मिळाल्यानंतर व्हिडीओ वडील माईक यांनी फेसबुकवर शेअर केला. हा व्हिडीओ लाखो लोकांनी शेअर केला आहे.


या घटनेबाबत रुडी यांनी स्वतः अत्यंत आनंदाने माहिती दिली. आजपर्यंत आयुष्यात असे होताना कधीही पाहिले नव्हते. अत्यंत वेगळ्या पद्धतीने मी मुलाला जन्म दिल्याचे रुडी यांनी फॉक्स 5 शी बोलताना सांगितले. व्हिडीओ या पद्धतीने समोर आल्यामुळे या मुलाचीही जगभर चर्चा आहे. फेसबुकच्या माध्यमातून आता या कुटुंबाने निधी जमा करणे सुरु केले आहे, जेणेकरुन सर्व कुटुंबासाठी एक गाडी घेता येईल.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर माईक यांनी ‘BEAUTIFUL nightmare!!’ असे कॅप्शन दिले. माईक यांना व्हिडीओ शेअर केल्यानंतर हजारो नोटिफिकेशन येत आहेत. त्यांनी पत्नी आणि मुलाच्या देखभालीबाबत रुग्णालयाचेही आभार मानले आहेत. मुलगा आणि आई दोघांचीही प्रकृती अत्यंत चांगली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Leave a Comment