व्यसन आणि फॅशन – सिगारेट व ई-सिगारेट!


तरुण वयच असे असते, की व्यसन आणि फॅशन या दोन्ही गोष्टी या वयात चटकन अंगीकारल्या जातात. त्यातही सिगारेटसारखी वस्तू चित्रपट, टीव्ही किंवा जाहिरातीच्या रूपाने सहजच तरुणांच्या हातामध्ये येते. प्रारंभी ही व्यसने काही प्रमाणात बरी वाटतात पण त्यांच्या आहारी गेल्यानंतर हीच व्यसने उग्र रुप धारण करुन या तरुणांचे बळी घेतात. या व्यसनांपैकी एक व्यसन म्हणजेच तंबाखूचे व्यसन किंवा तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन. अशा तंबाखूजन्य पदार्थांमध्ये सर्वात प्रमुख म्हणजे सिगारेट आणि आधुनिक जगात सिगारेटचे इलेक्ट्रॉनिक रूपही आले आहे. ही ई-सिगारेट युवकांमध्ये फॅशन म्हणून पसरली आहे आणि याच फॅशनरूपी व्यसनाने युवकांना वेढा घातला आहे, अशी माहिती एका ताज्या माहितीतून समोर आली आहे.

ई-सिगारेट ही इलेक्ट्रॉनिक निकोटीन डिलीवरी सिस्टिम (ईएनडीएस) या नावानेही ओळखले जाते. तसेच ई-सिग, वेप्स, ई-हुक्का, वेप पेन या नावांनीही ती ओळखली जाते. काही ई-सिगारेट सर्वसामान्य सिगार किंवा पाईपसारख्याच दिसतात. त्याचप्रमाणे ई-सिगारेट पेन ड्राईव्ह, पेन आणि रोजच्या वापरात असणाऱ्या वस्तूंप्रमाणे दिसतात. त्यामुळे या वस्तू तरूणांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करत आहेत.

मुंबईत एका संस्थेने केलेल्या पाहणीनुसार, बहुतांश युवक केवळ दिखाऊपणा करण्यासाठी आणि इतरांवर छाप पाडण्यासाठी ई-सिगारेटचा वापर करतात. यातील अनेकांना तर या ई-सिगारेटच्या दुष्परिणामांची माहितीही नाही. सलाम बॉम्बे फाउंडेशन नावाच्या संस्थेही ही पाहणी केली असून ही संस्था तंबाखू नियंत्रणासाठी काम करते. दरवर्षी 31 मे हा दिवस जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त आधी या संस्थेने मुंबईतील युवकांमध्ये या नव्या प्रकारच्या तंबाखूच्या वापराची माहिती घेण्यासाठी ही पाहणी केली. त्यासाठी संस्थेने मुंबईतील 300 पेक्षा अधिक युवकांचे सर्वेक्षण केले. या पाहणीचे निष्कर्ष धक्कादायक आहेत.

या सर्वेक्षणात भाग घेणाऱ्या 73 टक्के जणांनी ई-सिगारेट माहीत असल्याचे सांगितले. तसेच यातील 33 टक्के युवकांनी आयुष्यात कधी न कधी तिचे सेवन केले असल्याचेही सांगितले. विशेष म्हणजे यातील 56 टक्के तरुणांना ई-सिगारेट ही अन्य तंबाखूजन्य उत्पादनांपेक्षा कमी हानिकारक असल्याचे वाटते.

गेल्या वर्षी देशातील एक हजार डॉक्टरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ई-सिगारेटवर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यानंतर गेल्या वर्षी केंद्र सरकारने सर्वे राज्यांना ई-सिगारेटवर बंदी घालण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महाराष्ट्रात 5 मार्चपासून महाराष्ट्रात ई-सिगारेटवर बंदी घालण्यात आली आहे. जी व्यक्ती या बंदीचे उल्लंघन करेल तिच्यावर कारवाई केली जाईल. याबाबत विशेष तपास मोहीम नुकतीच सुरू करण्यात येईल, असे अन्न व औषधी प्रशासनाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी म्हटले आहे. तरीही ही परिस्थिती असेल तर खरोखर काळजी करण्यासारखीच परिस्थिती आहे.

‘सलाम बॉम्बे’च्या उपाध्यक्षा शेरिंग भूतिया यांच्या मते, सुरुवातीला तरुण केवळ ‘शायनिंग’साठी ई-सिगारेट हातात घेतात. मात्र ती आपला कब्जा कधी घेते हे त्यांना कळतही नाही. एकदा का ते या व्यसनात सापडले, की नकळत सामान्य सिगारेटकडे वळतात.

विशेष म्हणजे शरीराला होणाऱ्या नुकसानीच्या बाबतीत सामान्य सिगारेट आणि ई-सिगारेटमध्ये काहीही फरक नाही. धुम्रपानामुळे (सिगारेट ओढल्यामुळे) भूक न लागणे, आतड्याची कार्यक्षमता मंदावणे, श्वसन नलिकेत किंवा पोटात ‘व्रण’ होणे असे दुष्परिणाम होतात. धुम्रपानाचा सगळ्यात जास्त परिणाम श्वसनसंस्था आणि रक्ताभिसरण संस्था यांवर होतो. फुप्फुसाचे व श्वसनसंस्थेचे आजार होतात. रक्तदाब वाढणे, हृदयाला व इतर महत्वाच्या अवयांना रक्तपुरवठा कमी होणे हे दुष्परिणाम होतात. प्रदीर्घ धुम्रपानामुळे फुप्फुसाचा कर्करोग होऊ शकतो. हेच सर्व परिणाम ई-सिगारेटमध्येही दिसतात.

दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ई-सिगारेटमुळे आरोग्याला असलेला धोका बहुतेकांना माहीत असला तरी लोकांमध्ये तिच्या वापराचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे युवकांना ई-सिगारेटपासून परावृत्त करणे हे समाजापुढील फार मोठे आव्हान आहे.

Leave a Comment