राहुलनी काँग्रेसला संकटात ढकलले


लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर पक्षातील दिग्गजांच्या राजीनाम्याची संततधार सुरू झाली आहे. आतापर्यंत सहापेक्षा जास्त प्रदेशाध्यक्षांनी राजीनाम्याचा प्रस्ताव दिला आहे. खुद्द राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनीही राजीनामा दिला असल्याचे सांगितले जात असून त्यांनी आपला राजीनामा मागे घ्यावा, असा आग्रह पक्षाच्या नेत्यांनी धरल्याचे दिसते. मात्र राहुल हे आपल्या राजीनाम्यावर कायम असल्याचेही दिसून येते. या सर्व घटनाक्रमात अनेक नाटकीय वळणे येत आहेत. यातून काँग्रेससमोरील संकट मात्र वाढत जात असून राहुल गांधींनी काँग्रेसला संकटात टाकले असल्याचे साधारण चित्र आहे.

आपापल्या राज्यात पक्षाच्या वाईट कामगिरीची जबाबदारी घेत प्रदेशाध्यक्षांनी राजीनामा देण्याची मालिकाच काँग्रेसमध्ये सुरू झाली आहे. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सर्वात आधी राजीनामा देऊ केला. त्यानंतर झारखंड, पंजाब आणि आसामच्या प्रदेशाध्यक्षांनीही राजीनामा देऊ केला. मात्र स्वतः राहुल यांनी आपण राजीनाम्यावर ठाम असल्याचे सांगितल्यामुळे या सर्व नेत्यांचे भविष्य अधांतरी आहे. सध्या काँग्रेसचे नेते राहुल गांधींची समजूत काढण्यात गुंतलेले आहेत. राहुल गांधींनी अध्यक्षपद सोडू नये, यासाठी पक्षात त्यांच्या मर्जीप्रमाणे बदल करण्याची मुभा त्यांना देण्यात आली आहे. दुसरीकडे नवा अध्यक्ष निवडण्यासाठी राहुल यांनी आपल्या अनुयायांना एक महिन्याचा वेळ दिला आहे. काहीही झाले तरी प्रियंका गांधी काँग्रेसच्या अध्यक्षा बनू नयेत, ही त्यांची इच्छा आहे.

खरे पाहिले तर लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसची कामगिरी पाहिली तर राहुल गांधी यांच्या सहित अनेक प्रदेशाध्यक्षांनी राजीनामा देण्याची खरोखरच गरज आहे. कारण काँग्रेसचा झालेला पराभव हा खरोखर जबरदस्त आहे आणि त्या पराभवाची जबाबदारी कोणीतरी स्वीकारलीच पाहिजे.

काँग्रेसच्या पराभवासाठी राहुल गांधींसोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेही तेवढेच जबाबदार आहेत. यातील अशोक गहलोत, कमलनाथ आणि पी. चिदंबरम यांच्यासारख्या नेत्यांवर तर स्वतः राहुल यांनीच निशाणा साधला आहे. काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री राज्यात पक्ष जिंकावा म्हणून प्रयत्न करण्याऐवजी आपल्या मुलाच्या विजयासाठी ठाण मांडून बसले होते, असे ते म्हणाले यात काही चूक नाही. कमी-अधिक फरकाने सर्वत्र हीच स्थिती होती.

म्हणूनच काँग्रेसच्या जुन्या नेत्यांनी आणि दरबारी राजकारण्यांनी आग्रह केला, तरी राहुल गांधी आपल्या निर्णयावर ठाम आहेत. परंतु देशातील सर्वात जुना पक्ष म्हणविणाऱ्या काँग्रेसची ही मजबूरी आहे, की आतापर्यंत ती नेहरु-गांधी कुटुंबाच्या नेतृत्त्वावर अवलंबून राहिलेली आहे. यापूर्वी जेव्हा या कुटुंबाला बाजूला ठेवून पक्ष चालविण्याचा प्रयत्न करण्यात आला तेव्हा तेव्हा काँग्रेस अडचणीत आल्याचा इतिहास आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून अनेक दशके काँग्रेसचे एकहाती राज्य या देशावर होते. जवाहरलाल नेहरु आणि इंदिरा गांधी यांच्या काळात तर काँग्रेसला नावापुरतेही आव्हान नव्हते. राजीव गांधींच्या काळापर्यंत पक्ष अत्यंत मजबूत होता, मात्र विश्वनाथ प्रताप सिंह यांनी राजीव गांधींच्या विरोधात बंड करून काँग्रेस सोडली आणि राजीव गांधींचा पराभव झाला. त्यानंतर काँग्रेसच्या इमारतीची एक-एक विट ढासळायला लागली. एकानंतर एक दिग्गज नेत्यांनी काँग्रेसला रामराम केला. शरद पवार, ममता बॅनर्जी, के. चंद्रशेखर राव, जगनमोहन रेड्डी अशा नेत्यांचा यात समावेश होता. हे सर्व नेते आज आपापल्या राज्यात एक प्रबळ शक्ती म्हणून उभे टाकले आहेत.

राजीव गांधी यांच्या निधनानंतर सोनिया गांधींनी राजकारणात येण्यास नकार दिला. त्यानंतर काही वर्षे गांधी कुटुंबाशिवाय पक्ष चालविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पी. व्ही. नरसिंहराव यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसचा पराभव झाला, तर सीताराम केसरी यांच्या नेतृत्त्वाखाली तर काँग्रेसचे अस्तित्त्वच संकटात सापडल होते. अखेर सोनियांनी काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारून पक्षात प्राण फुंकले होते.

सोनियांच्या नेतृत्त्वातच संघर्ष केल्यामुळे 2004 मध्ये काँग्रेसला सत्तेत पुनरागमन करता आले होते. त्यानंतर 2009 मध्येही काँग्रेसने सत्तेत केलेल्या दमदार पुनरागमनात सोनियांचा सिंहाचा वाटा होता. सोनिया गांधींच्या निवृत्तीनंतर काँग्रेसला राहुल यांच्याशिवाय दुसरा चेहरा दिसला नाही. काँग्रेसचे नेतृत्त्व करण्यासाठी गांधी-नेहरु कुटुंबाशिवाय अन्य कोणत्याही व्यक्तीची कल्पना काँग्रेसजन करू शकत नाहीत. काँग्रेस पक्ष पूर्णपणे गांधी कुटुंबाचा आश्रित बनला आहे. हीच आज काँग्रेसची मोठी समस्या बनली आहे.

त्यामुळे नवा अध्यक्ष गांधी कुटुंबाबाहेरचा असावा, असे सांगून राहुल यांनी काँग्रेसजनांच्या समस्येत भर घातली आहे. या समस्येचा सामना करून तिच्यावर मात करणे यातच काँग्रेसचे भवितव्य सामावलेले आहे. आपल्या राजकीय भविष्यासाठी काँग्रेसला नव्या नेत्याचा शोध आज नाहीतर उद्या घ्यावाच लागणार आहे.

Leave a Comment