माऊंट एव्हरेस्ट – जगातील सर्वात गर्दीचे शिखर?


माऊंट एव्हरेस्ट हे नाव घेताच आपल्या डोळ्यासमोर एका शांत, निवांत आणि सुंदर पर्वतशिखराचे चित्र उभे राहते. मात्र वस्तुस्थिती काही वेगळीच आहे. जगातील सर्वात मोठे पर्वतशिखर मानल्या गेलेल्या हे शिखर आता जगातील सगळ्यात गर्दीचे शिखर ठरण्याची वेळ आली आहे.

एव्हरेस्ट सर करण्याची इच्छा बाळगणाऱ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. एडमंड हिलरी आणि तेनजिंग नोर्गे यांनी 1953 साली एव्हरेस्ट शिखर पहिल्यांदा सर केले होते. त्यानंतर आतापर्यंत 4 हजार गिर्यारोहक एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचले आहेत. यंदा आतापर्यंत 378 गिर्यारोहकांनी नेपाळ सरकारकडे एव्हरेस्ट चढण्यासाठी परवानगी मागितली आहे. या गिर्यारोहकांकडून परवानगीसाठी मोठी रक्कम मिळते, त्यामुळे नेपाळ सरकारही या संख्येवर नियंत्रण आणण्याचा विचार करत नाही. त्याचाच दुष्परिणाम म्हणून एव्हरेस्ट आता गर्दीने गजबजले आहे.

निर्मल पुरजा नावाच्या एका गिर्यारोहकाने अलीकडेच एक छायाचित्र प्रसिद्ध केले आहे आणि त्यातून माऊंट एव्हरेस्टवरील परिस्थितीची कल्पना येऊ शकते. गेल्या आठवड्यात एव्हरेस्टवर सात गिर्यारोहक मरण पावले आहेत. या बातमीच्या पार्श्वभूमीवरच प्रसिद्ध झालेल्या या छायाचित्राने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. जगातील सर्वात उंच शिखरांवर गिर्यारोहकांना कुठल्या स्थितीला तोंड द्यावे लागते, हे या चित्रातून दिसून येते.
या छायाचित्रात माऊंट एव्हरेस्टच्या कडेने गिर्यारोहकांची लांबच लांब रांग लागल्याचे दिसून येते. एव्हरेस्टजवळ अशा लांब रांगा दिसणे ही सामान्य गोष्ट आहे का? तर होय, स्थानिक गाईडच्या मते, गिर्यारोहणाच्या मोसमात सर्रास दिसणारे हे चित्र आहे.

सेव्हन समिट्स ट्रेक्सचे अध्यक्ष मिंगमा शेर्पा यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले, की सामान्यत: एवढी गर्दी नक्कीच असते. गिर्यारोहकांना शिखर गाठण्यासाठी 20 मिनिटांपासून 1.5 तासांपर्यंत रांगेत उभे राहावे लागते. चढाईसाठी योग्य हवामानाची किती वाट पाहावी लागते, यावर ते अवलंबून असते कारण गिर्यारोहकांना भयंकर वेगाने वाहणारे वारे टाळावे लागते.

“जर हवामान एक आठवडा निर्धोक असेल तर शिखरावर गर्दी नसते. मात्र कधीकधी जेव्हा केवळ दोन किंवा तीन दिवसांचे सुरक्षित हवामान मिळते तेव्हा तिथे खूप गर्दी होते कारण सर्व गिर्यारोहक तिथे एकाच वेळेस तिथे पोचण्याचा प्रयत्न करतात,” असे मिंगमा शेर्पा यांचे म्हणणे आहे.
अर्थात एव्हरेस्टवरच्या गर्दीची चर्चा होण्याची ही पहिलीच वेळ नाही. राल्फ डुजमोव्हिट्स नावाच्या जर्मन गिर्यारोहकाने 2012 मध्ये असेच एक छायाचित्र घेतले होते आणि ते व्हायरलही झाले होते. त्या छायाचित्रातही एव्हरेस्टवरील गिर्यारोहकांची रांग दिसत होती. या रांगेला त्याने “कोन्गा लाइन” असे नाव दिले होते.

डुजमोव्हिट्स यांनी 1992 मध्ये एव्हरेस्टवर पाऊल ठेवले होते आणि त्यानंतर सहा वेळेस या शिखरावर 8,000 मीटरपर्यंत (26,200 फूट) मजल मारली होती. शिखरावर अशा प्रकारच्या लांब रांगा लागणे हे धोकादायक ठरू शकते, असे त्यांचे म्हणणे आहे. “लोक जेव्हा रांगेत उभे राहतात तेव्हा त्यांना ऑक्सिजन कमी पडण्याचा धोका असतो आणि खाली उतरताना त्यांच्याकडे ऑक्सिजन पुरेसा नसतो.”

स्वतः डुजमोव्हिट्स यांच्याकडचे ऑक्सिजन1992 मध्ये खाली उतरताना संपले होते. “त्यावेळी कोणीतरी मला लाकडी हातोड्याने मारत असल्यासारखे वाटले. केवळ नशिबाने मी पुरेशी रिकव्हरी करू शकलो आणि शेवटी माझ्या मार्गावर सुरक्षितपणे उतरू शकलो,” असे त्यांनी सांगितले.

याहूनही वाईट म्हणजे एव्हरेस्टच्या मार्गावर गिर्यारोहकांसाठी ठेवलेले ऑक्सिजनचे सिलिंडरही कधीकधी चोरीला जातात. “एवढ्या उंचीवरील ऑक्सीजनची चोरी करणे हे एखाद्याला जीवे मारण्यासारखेच आहे,” असे एव्हरेस्टवर तीनदा चढाई करणाऱ्या माया शेर्पा यांनी सांगितले.

अलिकडच्या वर्षांत एव्हरेस्टवरील गर्दी वाढण्याचे एक कारण म्हणजे गिर्यारोहण मोहिमांचे वाढते प्रमाण. एव्हरेस्टच्या नेपाळच्या बाजूला जास्त गर्दी आहे. वास्तविक तिबेटची बाजू अधिक सोपी आहे, परंतु चिनी सरकार गिर्यारोहकांना सर्रास परवानगी देत नाही आणि चढाईसाठी फारशी थरारक नाही. त्यामुळे दक्षिणेकडील नेपाळी बाजूला सगळे गिर्यारोहक जमा होतात.

थोडक्यात म्हणजे अति तेथे माती या न्यायाने जगातील एका नैसर्गिक चमत्काराचे मानवी अतिक्रमणामुळे आपत्तीत रूपांतर होत आहे. हा वारसा जपायचा असेल तर हौसेला आवर घालायला पाहिेजे.

Leave a Comment