
कोलकाता – ३० मे सायंकाळी ७ वाजता राष्ट्रपती भवन येथे नरेंद्र मोदींचा पंतप्रधानपदाचा शपथविधी सोहळा होणार आहे. यावेळी मोदींसोबत इतर मंत्रीही शपथ घेणार आहेत. पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जीही या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार ममता बॅनर्जी
याबाबत ममता म्हणाल्या, देशाचा हा औपचारिक सोहळा असल्यामुळे इतर मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा करुन मी शपथविधीला उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे. काल तृणमूल काँग्रेसच्या २ आमदारांसह ५० ते ६० नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तृणमूल काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांत पश्चिम बंगालमध्ये तणावपूर्व वातावरण आहे. ममता यांनी तरीही मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे.
ममता बॅनर्जी आणि नरेंद्र मोदी यांच्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान चांगलीच खडाजंगी झाली होती. बंगालमध्ये भाजपने चांगली कामगिरी करताना ४२ पैकी १८ जागा जिंकत चांगलीच मुसंडी मारली होती. तृणमूलच्या खासदारांची संख्या २०१४ च्या तुलनेत २२ खासदारांवर आली.
