प्रवासाला निघण्यापूर्वी घ्या ही खबरदारी


सध्या सुट्ट्यांचे दिवस सुरु असल्याने परिवार किंवा मित्र मैत्रिणींच्या सोबत भटकंतीसाठी बाहेर पडण्याचे कार्यक्रम अनेकांनी ठरविले असतील. पण प्रवासाला निघण्यापूर्वी आणि प्रवास करताना काही गोष्टींची काळजी घेतल्याने प्रवासाचा एकंदर अनुभव चांगला येतो, आणि अकस्मात उद्भवणाऱ्या समस्या टाळता येऊ शकतात. अनेकांच्या बाबतीत प्रवासाच्या दरम्यान उलट्या, मळमळ, गाडी लागणे इत्यादी तक्रारी उद्भवत असतात. अशा वेळी प्रवासाला निघण्यापूर्वी भरपेट भोजन घेण्याच्या ऐवजी हलका आहार घ्यावा. प्रवासाच्या दरम्यानही आहार हलका असावा. प्रवासाच्या आधी किंवा प्रवास करताना मसालेदार, तळलेले पदार्थ घेणे आवर्जून टाळावे.

प्रवासाच्या पूर्वी किंवा प्रवासाच्या दरम्यान गोड पदार्थांचे अतिसेवन टाळावे. गोड पदार्थ पचण्यास वेळ लागतो, आणि प्रवासाच्या दरम्यान शरीराची हालचाल कमी होत असल्यामुळे अन्न पचण्यास वेळ लागत असतो. त्यामुळे गोड पदार्थांचे सेवन माफक प्रमाणातच करावे. प्रवासाला निघण्यापूर्वी मद्याचे सेवन करू नये. तसेच प्रवास करीत असतानाही मद्याचे सेवन टाळणे चांगले. प्रवासाच्या दरम्यान शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण योग्य राहण्यासाठी पाण्याचे वारंवार सेवन करणे आवश्यक आहे. तसेच सतत चहा, कॉफी, किंवा शीतपेयांच्या ऐवजी ताजे ताक, लस्सी, फळे या पदार्थांचे सेवन प्रवासाच्या दरम्यान केले जावे.

प्रवासाला सुरुवात करण्याआधी आवश्यक तेवढी विश्रांती घेतलेली असावी. विशेषकरून परदेशी प्रवास करणाऱ्या मंडळींची विमाने बहुतेकवेळी रात्री उशीराने असल्यामुळे रात्रभर व्यवस्थित विश्रांती मिळू शकत नाही. त्यामुळे प्रवासाच्या आधी आणि प्रवासाच्या दरम्यान शक्य तितकी विश्रांती घेण्याचा प्रयत्न करावा. प्रवासापूर्वी आपल्याला लागणारी सर्व औषधे, ओळखपत्रे, आवश्यक तितके पैसे आणि इतर महत्वाची कागदपत्रे सोबत घेतल्याची खात्री करून घ्यावी.

Leave a Comment